Nandurbar Crime | गो- तस्करांना पकडल्यानंतर दोन जमाव भिडले; दगडफेक करीत वाहन फोडले, प्राणघातक हल्ल्यात ५ जण गंभीर जखमी

गुन्हे दाखल, पोलिसांची सुरु होती गो तस्करांवर कारवाई, पोलिसांकडून धरपकड
Nandurbar Crime | गो- तस्करांना पकडल्यानंतर दोन जमाव भिडले; दगडफेक करीत वाहन फोडले, प्राणघातक हल्ल्यात ५ जण गंभीर जखमी
Published on
Updated on

नंदुरबार - पोलिसांनी आणि गो रक्षकांनी पाठलाग करून पकडलेल्या गो तस्करांच्या गाडीवर कारवाई सुरू असताना समोरासमोर आलेल्या दोन जमावामध्ये तुफान हाणामारी झाली. वाहन फोडण्यासह दगडांचा आणि काचेच्या बाटल्यांचा वापर केला गेला. त्यामुळे दोन वाहनांचे नुकसान झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. तथापि पोलिसांनी वेळेवर केलेली धरपकड आणि कारवाई मुळे तणाव निवळला.

याप्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शनिवारी रात्री उशिरा एका वाहनातून अवैधपणे काही गोवंश वाहून आणले जात असल्याची माहिती काही गोरक्षकांना आणि पोलिसांनाही प्राप्त झाली. त्यानुसार शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलिसांनी साक्री रस्त्यावर मागोवा घेत सापळा रचला. काही वेळातच त्यांना ते संशयित वाहन धावताना दिसले.

लगेच पाठलाग करून त्यांनी वाहनाला पकडले. पोलीस पथकाने रस्त्याच्या कडेला उतरवून वाहनातील गोवंशाची तपासणी सुरू केली. त्यावेळी त्यांना फक्त तीन गोवंश आढळल्याच्या सांगण्यात येते. त्याचा पंचनामा सुरू करत असतानाच गो तस्करांचा पाठलाग करणारे गोरक्षक दुसऱ्या एका वाहनातून तिथे येऊन पोहोचले. त्यांच्यातील वाद विकोपाला जाईल असे पाहून पोलीस कुमक बोलवण्यात आली. शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी वेळीच दखल घेत प्रसंग नियंत्रित केला.

तथापि, आपल्या वाहनातून गोरक्षक शहराकडे जात असतानाच साक्री नाक्यावरच्या पुलावर मुस्लिम मोहल्ल्यातील पंधरा-वीस जणांचा जमाव समोर आला आणि दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्या नजीकच्या परिसरातील गल्ल्यांमध्ये काचेच्या बाटल्यांचा आणि वीटा-दगडांचा खच पडलेला दिसला. घटना कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी अतिरिक्त पोलीस उप अधीक्षक कांबळे, एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि अन्य अधिकारी यांच्या माध्यमातून जमावाला नियंत्रित केले.

जमावाच्या अंगावर भरधाव वेगाने गाडी चढवण्याचा प्रयत्न करणे, जमावाने हल्ला करून वाहन फोडणे, दगड विटा आणि बाटल्यांनी प्राणांतिक हल्ला करणे असे प्रकार यादरम्यान घडले असल्याचे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे. जखमी झालेल्या सात पैकी पाच जणांना उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पहाटे उशिरापर्यंत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात प्राण घातक हल्ल्याच्या (अटेम्प्ट टू मर्डर) तीन गुन्ह्यांसह एकूण चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले.

त्यात अवैध गोवंश वाहतूक करून गो तस्करी करणे, भरधाव वेगाने अंगावर वाहन घालून खुनाचा प्रयत्न करणे, या आरोपाखालील गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांकडून अद्याप धरपकड चालू असून गो तस्करांसह दगडफेक करणाऱ्या काही जणांना अटक करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता राखून सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news