

नंदुरबार - कालीपिली टॅक्सीतून प्रवास करताना टपावर ठेवलेल्या बॅगेतून 18 लाख 56 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास करणाऱ्या चोराचा तपास करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले असून मुद्देमालासह चोराला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी परेश मुकेश कोठारी, वय ३५ वर्षे, राहणार- अशोक नगर, कांदिवली पूर्व मुंबई हे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी शहादा येथून शिरपुरला कालीपीली क्र. MH.१८ N.६५७७ टॅक्सीत बसून जात होते. तेव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या एका अज्ञात इसमाने गाडीच्या टपावर म्हणजे कॅरीवर ठेवलेल्या बॅगेतून एकूण १८,५६,३१० रुपये किंमतीचे एकूण २१५.८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सारंगखेडा पोलीस ठाण्यात दिनांक २८ जून २०२५ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मगन चिमा वसावे वय २४ वर्षे राहणार- खरवडचा आगरबारी पाडा ता. धडगाव जि. नंदुरबार यास ताब्यात घेतले. त्याने २-३ महिन्यापुर्वी गाडीच्या कॅरीवर ठेवलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले.
सदरची कारवाई नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्रवण दत.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश वावरे, पोउनि. किरण बाहे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, पोलीस नाईक विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोलीस शिपाई शोएब शेख, सतिष घुले, भरत उगले यांच्या पथकाने केली.