

Dudhale Murder Case Nandurbar Police Investigation
नंदुरबार : आजीशी कर्जाच्या कारणावरुन वाद घालतात, या कारणावरून संतप्त नातवाने तुटलेल्या लोखंडी खाटेच्या तुटलेल्या पायाने मामाच्या डोक्यावर घाव घातला. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष उदास गावीत ( रा. दुधाळे, ता. नंदुरबार) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी रेखा सुभाष गावीत यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेखा यांचे पती सुभाष गावीत हे नेहमी त्यांची आई सुगाबाई सुभाष गावीत यांच्याशी वाद घालायचे. शेती कर्जाच्या कारणावरुन त्यांच्यात वाद होत असत. दि. २९ एप्रिलरोजी रात्री ९ वाजता असाच वाद होत असताना सुभाष यांच्या बहिणीचा मुलगा सुरेंद्र पप्पु ठाकरे (वय १९, रा. दुधाळे) याला प्रचंड राग आला. त्या रागाच्या भरात त्याने लोखंडी खाटेच्या तुटलेल्या पाय घेतला आणि सुभाष यांच्या डोक्यात डाव्या बाजुस दोन वेळा मारुन गंभीर जखमी केले. त्यामुळे सुभाषच्या डोक्यातून व कानातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.
त्यांच्यावर ११ मेपर्यंत नंदुरबार येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृतीमध्ये काही एक सुधारणा झाली नाही. त्यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे दाखल केले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा हॉस्पीटल सुरत येथे दाखल केले. परंतु, तेथे उपचारादरम्यान सुभाष यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ करीत आहेत.