

Illegal alcohol production
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील गडदाणी येथे एका पडक्या घरात छापा टाकला असता मानवी शरीरास अपायकारक असलेली बनावट संत्रा दारु तयार करुन चोरटी विक्री करण्याचा मोठा उद्योग उघडकीस आला. एकुण 10 लाख 79 हजार 882 रुपयांची बनावट दारु आणि बनावट दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करीत धुळ्यातील दोघांसह पोलिसांनी तीन जणांना अटक केली.
याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्यांमध्ये सिताराम पवण शर्मा (वय २५ ) रा. माधवपुरा गल्ली नं. ६ धुळे, हरीष राजेंद्र चौधरी (वय ३७ ) रा. प्लॉट नं. १७४ शासकीय दुध डेअरीच्या पाठीमागे श्रीराम नगर धुळे, अमृत पंतु गावीत (वय ३३) वर्ष रा. गडदाणी ता. नवापुर जि. नंदुरबार (घरमालक) आणि हुसेनभाई धुळे (फरार) या चौघांचा समावेश असून तिघांना अटक करण्यात आली आहे तर फरार असलेल्याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील अमृत पंतू गावीत याच्या पडक्या घरात हा बनावट दारू निर्मितीचा उद्योग चालू होता. त्या घरात छापा टाकला असता पोलिसांना ५०,००० बॉटल बुच सिलींग करण्याचे मशिन, ३ लाख २२ हजार रु. कि. च्या १८० मिलीच्या बनावट दारु असलेल्या प्लॉस्टिकच्या विना लेबलच्या ४६०० बाटल्या, २ लाख ५८ हजार ७२०/- रु. किं ची देशी दारु सुगंधीत संत्रा नवाची स्टिकर असलेली एकुण ७७ खोकी, प्रत्येक खोक्यात १८० मिलीच्या ४८ नग प्रमाणे ३६९६ प्लास्टिकच्या बाटल्या आढळून आल्या. त्या ठिकाणी बनावट दारूचा केवढा जंगी कारभार चालत होता याचा अंदाज यावरून येतो.
छापा टाकलेल्या ठिकाणाहुन बजाज मॅक्सिमा तीनचाकी माल वाहतुक रिक्षा क्र. MH ४८ BF ९७७५ सह एकुण 10 लाख 79 हजार 882 रुपयांची बनावट दारु आणि बनावट दारु बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत.