

नंदुरबार: डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.
हिना गावित यांच्यासह भाजपात प्रवेश करणारे कार्यकर्ते-पदाधिकारी कोण?
डॉक्टर हिना गावित यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा परिषदेतील माजी सभापती हेमलता ताई शितोळे यांनी शहादा तालुक्यातील, एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, प्रताप वळवी यांनी अक्कलकुवा तालुक्यातील, तर सुभाष आप्पा पावरा यांनी धडगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य सरपंच आणि गाव पातळीवरील शेकडो कार्यकर्त्यांसह याप्रसंगी भाजपात प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद सदस्य नितेश वळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, निवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग तडवी, हिरा पाडवी, महेश तवर आणि अन्य पदाधिकारी यांचा देखील प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
एक वर्षांनंतर पुन्हा भाजपात
हिना गावित यांनी एक वर्षांपूर्वी भाजपाला सोडचिठ्ठी देत अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. आता पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केल्यानंतर हिना गावित म्हणाल्या, मी भाजपाची कार्यकर्ता म्हणून कार्य करणार असून नंदुरबार जिल्ह्यातील संघटन वाढीस लावण्याचे लक्ष राहणार आहे.
कोण आहे डॉ. हिना गावित?
2014 या वर्षी भाजपात प्रवेश करत डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी राजकारणात पहिले पाऊल ठेवले. लगेचच त्यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली. 2014 च्या त्या सर्वत्रिक लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून त्या प्रथमच खासदार बनल्या. नंतर 2019 च्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवून त्या दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.