

Chandsaili ghat pickup falls into valley
नंदुरबार: अस्तंबा शिखरावरून परतणाऱ्या भाविकांनी भरलेले वाहन घाटातून थेट 100 फूट खाली कोसळून 8 भाविक जागीच ठार झाले. तर 15 गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि. 18) सकाळी 10.30 वाजता घडली. या अपघातातील मृत भाविक नंदुरबार तालुक्यातील आहेत. ऐन दिवाळीत काळाने घाला घातल्याने शोककळा पसरली आहे.
अधिक माहिती अशी की, महाभारतातील अश्वत्थामा यांचा रहिवास असलेले शिखर म्हणून धडगाव तालुक्यातील अस्तंबा शिखर प्रसिद्ध आहे. धडगाव तालुक्यातील असली येथे दरवर्षी दिपावलीत अस्तंबा (अश्वत्थामा) ॠषीची यात्रा भरत असते. गिर्यारोहणाचा तसेच अश्वत्थामापूजनाचा आनंद घेण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी भेट देतात. त्यानुसार यंदाही शेकडोच्या संख्येने अस्तंबा येथे लोक जात आहेत. दरम्यान काल वसुबारसच्या दिवशी नंदुरबार तालुक्यातील काही भाविक अस्तंभा (अश्वत्थामा) ॠषिच्या दर्शनासाठी गेले होते.
आज तेथून परत येत असताना चांदसैली घाटात या भाविकांची पिकअप गाडी थेट खोल दरीत कोसळून मोठा दुर्दैवी अपघात झाला. अपघात एवढा भयानक होता की, या अपघातात 8 जण जागीच ठार झाले. यातील 6 जण नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील तर 2 जण कोरीट येथील रहिवासी आहेत. 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सुमारे 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी विखुरलेल्या अवस्थेत मृतदेह पडले होते. अपघाताचे वृत्त कळताच नंदुरबार, तळोदा येथून अनेक कार्यकर्त्यांनी चांदसैली येथे धाव घेतली.
या पिकअप गाडीमध्ये जवळपास २५ हून अधिक भाविक असल्याचे समजते. दरम्यान, गंभीर जखमी भाविकांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.
या अपघाताचे वृत्त कळताच माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य गतिमान केले. तळोदा येथील आमदार राजेश पाडवी यांनी देखील घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले.