

नंदुरबार : आज सोडत जाहीर करण्यासाठी झालेल्या सभेच्या दरम्यान घोषित करण्यात आल्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या एकूण 56 गटांपैकी अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 44, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी (ओबीसी) 11 असे आरक्षित झाले आहेत. यातील 28 गट महिला आरक्षित झाले आहेत. त्याचप्रमाणे 6 पंचायत समितींपैकी तीन पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी महिलांसाठी तर तीन पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी पुढील अडीच वर्षे आरक्षित घोषित करण्यात आले आहे.
आगामी नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक अनुषंगाने जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण यातील आरक्षण सोडती द्वारे काढण्यासाठी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आगामी पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर गठीत होणाऱ्या पंचायत समित्यांमधील पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी असणारे सभापती पद अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले असून या आरक्षणाची सोडत काढण्यासाठी आज सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृह येथे सभा घेण्यात आली. जिल्हाधिकारी मिताली सेठी आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रमोद भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान मुलीच्या हातून आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार आरक्षण घोषित करण्यात आले.
सोडतीनुसार अक्कलकुवा, अक्राणी आणि शहादा या-तीन तालुक्यांच्या पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमाती महिला म्हणजे आदिवासी महिलेसाठी आरक्षित झाले तर नंदुरबार नवापूर आणि तळोदा या तीन पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती साठी आरक्षित झाले.
नंदुरबार जिल्हा परिषदेचे एकूण 56 गट असून त्यापैकी 28 गट महिला आरक्षित झाले आहेत. सोडती द्वारे या 56 जागांचे म्हणजे गटांचे जाहीर झालेले आरक्षण याप्रमाणे: अनुसूचित जाती जागा 1, अनुसूचित जमाती 44 जागा पैकी महिलांसाठी राखीव 22, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) जागा 11 पैकी महिलांसाठी राखीव 6.
अक्कलकुवा: अक्कलकुवा पंचायत समितीचे एकूण 20 गण असून त्यापैकी 10 महिलांसाठी राखीव झाले आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील 20 पैकी एकही गण ओबीसी आणि अनुसूचित जातीसाठी राखीव नाही. 17 गण अनुसूचित जमाती साठी राखीव आहेत त्यापैकी नऊ महिलांसाठी राखीव आहेत. तर 3 गण सर्वसाधारण साठी रक्षित असून त्यातील एक महिलांसाठी राखीव आहे.
अक्राणी: अक्राणी पंचायत समितीचे एकूण 14 गण आहेत. त्यापैकी 7 महिलांसाठी राखीव झाले आहेत. विशेष असे की अक्राणी तालुक्यातील 14 पैकी सर्व जागा आदिवासींसाठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत आहेत. एकही गण सर्वसाधारण, ओबीसी किंवा अनुसूचित जातीसाठी राखीव नाही.
तळोदा: तळोदा पंचायत समितीचे एकूण 10 गण आहेत. त्यापैकी 9 जागा आदिवासींसाठी म्हणजे अनुसूचित जमातीसाठी आरक्षीत असून त्यापैकी 5 महिलांसाठी राखीव झाले आहेत. तर एक जागा सर्वसाधारण साठी आरक्षित आहे. एकही गण नागरी मागासवर्ग म्हणजे ओबीसी किंवा अनुसूचित जातीसाठी राखीव नाही.
शहादा: शहादा पंचायत समितीचे एकूण 28 गण असून त्यापैकी 14 महिलांसाठी राखीव झाले आहेत. यातील 17 गण अनुसूचित जमाती साठी राखीव आहेत त्यापैकी 9 महिलांसाठी राखीव आहेत. 7 गण ओबीसी म्हणजे नागरी मागासवर्ग साठी आरक्षित असून त्यातील 4 महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी एकच आणि तोही महिलासाठी राखीव आहे. तर 3 गण सर्वसाधारण साठी आरक्षित असून त्यातील एकही जागा महिलांसाठी नाही.
नंदुरबार: नंदुरबार पंचायत समितीचे एकूण 20 गण असून त्यापैकी 10 महिलांसाठी राखीव झाले आहेत. यातील 12 गण अनुसूचित जमाती साठी राखीव आहेत त्यापैकी 6 महिलांसाठी राखीव आहेत. 5 गण ओबीसी म्हणजे नागरी मागासवर्ग साठी आरक्षित असून त्यातील 3 महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी एकच राखीव आहे. तर 2 गण सर्वसाधारण साठी आरक्षित असून त्यातील 1 जागा महिलांसाठी आरक्षित आहे.