

Brahmas horse 15 crore Record break bid
नंदुरबार : सारंगखेडा येथील घोडेबाजार दरवर्षी नवे वैशिष्ट्य नोंदवत असतो त्याप्रमाणे यंदा देखील येथील चेतक फेस्टिवल मध्ये ब्रह्मास हा सुमारे 15 कोटी रुपये किंमतीचा बहुचर्चित किमती घोडा आज (दि.११) दाखल झाला. सारंगखेडा घोडेबाजारात घोड्यांच्या किमतीने आतापर्यंत 11 कोटींची सर्वाधिक बोली गाठली असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मास ची किंमत रेकॉर्ड ब्रेक ठरली आहे. त्याचे दिसणे, त्याची वातानुकूलित तंबूतील बडदास्त, सगळ्याच गोष्टी अश्वप्रेमींच्या उत्सुकतेचा विषय बनले आहेत.
गुजरात राज्यातील 'ब्रह्मास' आज सकाळी येथे दाखल झाला. त्यावेळी चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी अश्व मालक भंडारी यांचे स्वागत केले . सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त भरणारा घोडे बाजार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याचे हे द्योतक मानले जात आहे. चेतक फेस्टिवलची जोड मिळालेल्या या बाजारात यंदा तब्बल ३२०० घोडे दाखल झाले आहेत . त्यापैकी पाचशेहून अधिक अश्वांची किमंती कोटीच्या घरात आहे. ''ब्रह्मास'' हा अश्व बाजाराची शोभा वाढवित आहे. त्याने अश्व प्रेमीवर गारुड केले असून त्याला पाहण्यासाठी गर्दी होत आहे .
'ब्रह्मास' मारवाड जातीचा घोडा आहे. मारवाड जातीचे घोडे प्रचंड बळकट असतात. तसेच त्यांची शरीरयष्टी मजबुत असते. ब्रम्हास मजबूत आकर्षक बांध्याचा आहे. ब्रम्हासचे वैशिष्ठ्य म्हणजे अन्य अश्वांप्रमाणे त्याला काजू , बदाम, अंडे याचा आहार दिला जात नाही. तर करडीची कुट्टी, हरभरे व दूध असा साधा खुराक दिला जातो, अशी माहिती घोडामालक भंडारी यांनी दिली. नियमित व्यायाम करून घेतला जातो.
दरसहा महिन्यांनी त्याचे लसीकरण केले जाते. या अश्वांच्या कानाची टोके उंच आहेत . अश्वांची कानाची टोके उंच असणे शुभ लक्षण मानले जाते. येथील चेतक फेस्टिवल च्या प्रांगणातील व्हीआयपी कक्षात त्याची निगा राखण्यासाठी शाही व्यवस्था करण्यात आली आहे . ब्रम्ह्यास साठी खास एसी आणि पेंडॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे . त्याच्या सेवेसाठी चार सेवेकरी तैनात केलेले आहेत.
सारंगखेडा येथील श्री दत्तप्रभू यात्रेनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या चेतक फेस्टिवल मधील घोड्यांच्या माध्यमातून होणारी उलाढाल दिवसागणिक उंचीवर जात आहे. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज दिनांक 11 डिसेंबर 2025 अखेर 2 कोटी 12 लाख 79 हजार रुपयांपर्यंत ही उलाढाल पोहोचली. आज 11 डिसेंबर 2025 रोजी 51 घोड्यांची विक्री झाली व त्यातून 29 लाख 9 हजार रुपयांची उलाढाल झाली.