

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा दूध संघातील तुपाप्रमाणे आता 14 टन लोणी (बटर) व 9 टन दूध पावडरचा माल परस्पर विक्री करून दूध संघाची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली, अशी लेखी तक्रार चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज (दि.११) जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे दिली.
आ. मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जळगाव जिल्हा दूध संघात यापूर्वी चांगल्या तुपाची परस्पर विल्हेवाट लावून मोठा अपहार केला होता. याच पद्धतीने अलीकडच्या काळात जिल्हा दूध संघाच्या फिनिश प्रॉडक्ट विभागाच्या रेकॉर्डला 14 टन बटर अर्थात लोणी पाठवल्याची नोंद 2 ऑक्टोबररोजी करण्यात आली आहे. सदरील बटर हे अतिरिक्त प्रॉडक्ट असल्यामुळे इतरत्र असलेल्या कोल्ड स्टोरेजच्या ठिकाणी पाठविण्यात आले. जसे की यामध्ये सातारा येथील पी.डी. शहा अँड सन्स, वाई याठिकाणी पाठविण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे.
परंतु तेथून परत आलेल्या मालात 70 ते 75 टक्के हा विकास अर्थात जिल्हा दूध संघाच्या प्रॉडक्शन नव्हता. यामध्ये जिल्हा दूध संघाचे फक्त 100 ते 150 खोके आढळून आले. उर्वरित माल हा बिना खोक्याचा आहे. म्हणजेच जळगाव दूध संघाचे पॅकिंग नाही. यात चेअरमन, कार्यकारी संचालक व काही ठरावीक कर्मचार्यांनी अत्यंत हुशारीने व नियोजनबद्धरित्या विकासचे चांगल्या प्रतीचे व ब्रँड असल्यास मागणी असलेले बटर अर्थात लोणी हे परस्पर विकून दूध संघाची फसवणूक केली आहे.
असाच प्रकार 8 ते 9 मॅट्रिक टन दुधाची भुकटीचाही झालेला आहे. तोदेखील गायब झाला असून त्याची परस्पर विक्री करण्यात आली आहे. यामध्ये देखील दोन ते अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याची चौकशी अहवाल सादर करून तत्काळ शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक अहवाल नोंदवून घ्यावा, अशी मागणी आ. मंगेश चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
हेही वाचलंत का ?