

जळगाव : उतराखंडमध्ये अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे विशेष बैठक घेऊन तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्र सदन येथे झालेल्या बैठकीला स्मिता शेलार, आशुतोष दिवेदी (सहाय्यक निवासी आयुक्त) आणि प्रमोद कोलपते (व्यवस्थापक) हे उपस्थित होते. बैठकीत भाविकांच्या सुटकेसाठी राज्य शासनाच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.
पालकमंत्री पाटील यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे खासगी सचिव हिमांशू यांच्याशी थेट संपर्क साधून भाविकांना शक्य तितक्या लवकर दिल्लीमार्गे बाहेर काढण्याची विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत हिमांशू यांनी भाविकांच्या सुरक्षिततेची हमी दिली आहे. तसेच उतराखंडचे पोलीस उपमहानिरीक्षक निलेश भरणे यांच्याशीही संपर्क साधण्यात आला.
पालकमंत्री पाटील हे कालपासून दिल्लीमध्येच मुक्कामी थांबून विविध यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी सतत संपर्क ठेवून आपत्ती व्यवस्थापन विभाग, रेल्वे प्रशासन व इतर यंत्रणांशीही संपर्क सुरू केला आहे.
पाळधी (ता. धरणगाव) येथील १३ तरुण
जळगाव शहरातील १ कुटुंब (३ व्यक्ती)
हे सर्वजण सध्या उतराखंडमधील हर्षिलजवळील भगिरथी होमस्टे, बागोरी येथे अडकले आहेत.
अडकलेल्या भाविकांची नावे अशी...
रोहन दिनेश माळी
रोहील बंडू माळी
मनोज संजय चौधरी
ज्ञानेश्वर संजय माळी
दिपक रत्नाकर सोनार
सुखदेव नन्नवरे
दिपक माळी
वैभव गंगवणे
संदीप माळी
विशाल पाटील
रिवेश माळी
भुषण माळी
पवन माळी
अनामिका मेहरा
आरोही मेहरा
रुपेश मेहरा
सर्व भाविक सुरक्षित असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमार्फत आणि उतराखंड प्रशासनाच्या मदतीने सुटकेसाठी तातडीची कार्यवाही सुरु आहे.
नातेवाईकांना पालकमंत्र्यांनी दिलं आश्वासन
अडकलेल्या भाविकांच्या जळगावमधील नातेवाईकांना धीर देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, "सरकार आपल्यासोबत आहे. सर्व यंत्रणा कार्यरत आहेत आणि भाविकांना सुखरूप परत आणले जाईल."