

जळगाव : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे ढगफुटी झाली असून या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील १९ भाविक अडकले आहेत. त्यापैकी तीन भाविकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने बुधवारी (दि.६) दिली. मात्र, जिल्ह्यातील पाळधी आणि धरणगाव येथील १३ तरुणांशी संपर्क तुटल्याने खळबळ उडाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
जळगाव शहरातील अयोध्या नगर , धरणगाव, पाळधी, पाचोरा येथील १९ भाविक उत्तराखंडमधील उत्तर काशीला देवदर्शनाला गेलेले होते. यामध्ये पाळधी येथील १३, धरणगावातील दोन तर पाचोरा येथील एक जळगाव येथील तीन अशा १९ भाविकांचा समावेश होता.उत्तर काशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे हे भाविक त्या ठिकाणी अडकले आहेत. यातील तीन भाविकांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून इतर भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनामिका मेहरा, आरोही मेहरा आणि रुपेश मेहरा हे तिघेही सुखरूप आहेत. नेटवर्कच्या समस्येमुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नव्हता. जिल्हाधिकारी कार्यालयाने या भाविकांच्या कुटुंबियांचा उत्तराखंड येथील होम स्टे मालकाशी थेट संपर्क जोडून दिल्याची माहिती जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.रोहन दिनेश माळी, रोहित बंडू माळी, मनोज संजय चौधरी, ज्ञानेश्वर संजय माळी, दिपक रत्नाकर सोनार, संगदीप भारत नंनवरे, दीपक माळी, वैभव गंगवने, संदीप माळी, विशाल पाटील सुरत, रिंकेश खुशाल माळी, भूषण सुरेश माळी, पवन माळी हे भाविक धरणगाव व पाळधी येथील असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. उत्तराखंडच्या कॉर्डिनेशन विभागाशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली असून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
पाळधी येथील माळीवाडा परिसरातील १३ तरुण २७ जुलैला (क्रमांक MH 19, CY 2202) या टेम्पो ट्रॅव्हलरने यात्रेसाठी निघाले होते. त्यांच्याशी ५ ऑग्रस्टला शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. संपर्क तुटल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.