जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहरात खुनाचे सत्र पुन्हा सुरू झालेले आहेत. बुधवारी (दि.29) रात्री 10 च्या सुमारास शहरातील मुख्य रस्त्यावर गाडीतून जात असलेल्या दोन युवकांवर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात गाडीमधील युवक गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. संतोष बार्शी आणि सुनील राखुंडे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहर हे संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात काही वर्षांपूर्वी मोहन बार्शी याचा भरदिवसा खून झाला होता. बुधवारी (दि.29) रात्री दहाच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बार्शी आणि त्यांचे व्यवसायिक मित्र सुनील राखुंडे हे गावातून जळगाव शहरात येत होते. दरम्यान सातारा भागातील मरीमाता मंदिराजवळून (एमएच 19 ईजी 0187) या गाडीतून जात होते. दरम्यान सुनील राखुंडे हे वाहन चालवत होते. त्यावेळेस अचानक कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या घटनेमुळे भुसावळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर रुग्णालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. वाल्मीकनगर परिसरामध्ये काही अप्रिय घटना होऊ नये, म्हणून या ठिकाणीही पोलिसांनी टास्कफोर्स सुद्धा नियुक्त केलेली आहे.
हेही वाचा :