

जळगाव : एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. पाचोरा शहरातील व्हीपी रोडवरील सुपडू भादू पाटील या शाळेत बुधवारी (दि.२५) ही घटना घडली. शिक्षक रवींद्र भारत महाले असे या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविंद्र महाले यांनी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर ते शिकवत असलेल्या वर्गाच्या समोरील वर्गामध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार, सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ, उपनिरीक्षक घायाळ, पोलीस हवालदार योगेश पाटील, हरीश परदेशी, संतोष राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. रवींद्र महाले हे त्यांच्या बोलक्या स्वभावामुळे आणि चांगल्या व्यक्तिमत्त्वामुळे परिचित होते. या घटनेमुळे शाळेत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अस्पष्ट आहे. पाचोरा पोलिसांकडून याप्रकरणी कसून तपास सुरू आहे.