

Satara Crime News
सातारा : चारित्र्याचा सतत संशय घेणार्या पतीने पत्नीशी भांडण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. मंगळवार पेठ सातारा येथे हा प्रकार घडला असून सौ. अंजली राजेंद्र शिंदे (वय 29, रा. रवी रेजन्सी, मूळ रा. पानमळेवाडी, ता. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर पती व मृत महिलेचा भाऊ यांच्यात झटापट होऊन संशयित पती राजेंद्र भानुदास शिंदे (वय 32) हा जखमी झाला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सौ. अंजलीचा भाऊ श्रेयस अनिलकुमार पाटील (वय 20, रा. करंजे) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सौ. अंजली व राजेंद्र शिंदे यांचे 11 वर्षांपूर्वी लग्न झाले असून यांच्यामध्ये गेल्या 8 वर्षांपासून वारंवार वाद होत होते. राजेंद्र शिंदे हा सेंट्रिंग कामगार असून ते गेल्या वर्षीपासून आपल्या दोन मुली, पत्नीसह सातारा येथे राहण्यास आले होते. शिंदे हा आपली पत्नी अंजली हिच्यावर वारंवार चारित्र्यावरून संशय घेत होता. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात अनेक वेळा पती-पत्नीच्या वादातील तक्रारी झाल्या होत्या.
त्यावेळी वाद मिटवण्यात आला होता. दि. 19 जून रोजी नवरा-बायकोमध्ये पुन्हा भांडण झाले.या भांडणाची कल्पना अंजली शिंदे यांनी आपल्या माहेरच्या लोकांना दिली होती. त्यानंतर राजेंद्र याने चिडून जाऊन अंजली हिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शुक्रवार दि. 20 रोजी सकाळी मुली शाळेत गेल्या होत्या. त्यांना घेऊन त्यांचा मामा श्रेयस माघारी आला. मुलगी कॉटच्या खालील गाठोड्यात काही तरी घेण्यास गेली असता तिला पाय दिसले. मुलींनी याबाबत मामाला कल्पना दिली. श्रेयसने पाहिले असता तेथे अंजली यांचा मृतदेह घरातील कॉटच्या खाली कपड्याच्या गाठोड्याने झाकलेल्या स्थितीत आढळून आला.
दरम्यान, या घटनेमुळे फिर्यादी श्रेयस पाटील व संशयित राजेंद्र शिंदे यांच्यात धक्काबुक्की झाली. यात राजेंद्र शिंदे जखमी झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे सातारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत अंजली शिंदे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिर्के करत आहेत.
तब्बल अडीच तास शवविच्छेदन
संशयित राजेंद्र शिंदे याने पत्नी अंजली हिचा खून करून गाठोड्यांच्या मागे लपवून ठेवला होता. अंजली हिच्या मृतदेहाचे विच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले आहे. सुमारे अडीच तास हे शवविच्छेदन करण्यात आले; पण अंजली यांच्या अंगावर एकही व्रण दिसला नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकार्यांसह पोलिसांचे टेन्शन वाढले आहे. राजेंद्र हा बेशुद्ध अवस्थेत असून तो शुद्धीवर कधी येतोय, याची वाट पोलिस पाहत आहेत. अंजली हिचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.