

Police Raids on Illegal Sand Extraction and Gambling
तळणी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यात अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी जोरदार मोहिम उघडली आहे. तालुक्यातील कानडी येथील नदी पात्रातुन अवैध वाळू उपसा करणारा ४ लाख रुपयांचा जेसीबी जप्त करण्यात आला असतांनाच दहीफळ खंदारे शिवारात सुरु असलेल्या दोन जुगार अड्डयावर छापा टाकण्यात आल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांच्या तीन कारवायात ५ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मंठा पोलिसांना मिळताच पोलिसांनी रास नदीपात्रात धाड टाकली. यावेळी अवैधरित्या वाळू उपसा करत असलेला चार लाख रुपयांचा जेसीबी (क्र. एमएच २१ एडी १७५७) पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांच्या फिर्यादीवरून संभाजी गणपत गोंडगे (रा. इंचा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंठा पोलिसांनी दुसरी कारवाई दहिफळ खंदारे येथील शेतशिवारात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर केली. या कारवाईत राजू मस्के व राजेश विश्वनाथ राठोड (दोघे रा. दहिफळ) यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सुनिल होंडे यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक तेघबिरसिंग सिंधू, अप्पर पोलीस अधिक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख, पोलीस निरीक्षक संतोष माळगे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष बनकर, रखमाजी मुंढे यांनी केली.
मुद्देमाल जप्त
तळणी शिवारात शिवारात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर टाकण्यात आलेल्या छाप्यात १ लाख ६१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रहिम रौफ शेख, अलोक रमेश राठोड, ज्ञानेश्वर पांडुरंग काजळे, समीर शफी पठाण, लक्ष्मण शालीकराम मनकाळे, (सर्व रा. तळणी), तसेच संपत बन्सी जाधव व अमोल सखाराम जाधव (दोघे रा. सासखेडा) अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.