

Jalgaon District MahaStride Scheme
जळगाव : राज्य शासनाच्या ‘महास्ट्राईड’ प्रकल्पांतर्गत कामगिरीच्या मूल्यमापनात जळगाव जिल्ह्याने १०० टक्के एकत्रित गुणांकन मिळवत राज्यात सर्वोच्च कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्हा १६ कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीस पात्र ठरला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने केलेल्या सांघिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य आणि संविधानाने दिलेली न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुतेची मूल्ये जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शेतकरी, महिला, युवक, कामगार, उद्योजक, शिक्षक, शास्त्रज्ञ आणि जवानांच्या योगदानातून देशाच्या विकासाला गती मिळत आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून त्यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘महाराजस्व’ शिबिरांतून दोन लाखांहून अधिक लाभार्थी
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत मार्च ते मे २०२६ दरम्यान ९६ शिबिरांतून १ लाख ९ हजार ८२४, तर २२ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान ११ विधानसभा मतदारसंघनिहाय शिबिरांतून १ लाख ९ हजार ६९३ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
महिला व बालकांच्या संरक्षणासाठीही विविध उपक्रम राबविण्यात येत असून, एप्रिल २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत १२४ अनाथ बालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यापैकी सात जणांना शासकीय सेवेत संधी मिळाली. ‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या माध्यमातून चालू वर्षात ३१६ संकटग्रस्त महिलांना विविध प्रकारचे सहाय्य मिळाले.
आरोग्य क्षेत्रात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहीम राबविण्यात येत असून, क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत ५ लाख १३ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी ९४५ गावे क्षयरोगमुक्त घोषित करण्यात आली आहेत.
‘व्यसनमुक्त जळगाव, विकसित जळगाव’चा संकल्प
युवकांनी आपली ऊर्जा शिक्षण, क्रीडा, कौशल्य, नवउद्योजकता आणि देशसेवेसाठी वापरावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. ‘व्यसनमुक्त जळगाव, विकसित जळगाव’ घडविण्यासाठी युवकांसह पालक, शिक्षक, सामाजिक व धार्मिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या जलसंधारण सप्ताहात तसेच २१ ऑगस्टच्या ‘महा वॉकेथॉन—वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कर्तृत्वाचा गौरव
‘महास्ट्राईड’मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सन्मान करण्यात आला. देशांतर्गत सुरक्षा मोहिमेत जखमी झालेल्या सीआरपीएफ कॉन्स्टेबल जावीद अहमद शेख यांना ताम्रपट पदकाने गौरविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्यासह २६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
समारोपप्रसंगी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हावासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत संविधानाच्या मूल्यांचा सन्मान राखून विकसित जळगाव आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.