

Three Burglaries Jalgaon
जळगाव : जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मेहुणबारे, बोदवड व पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या वेगवेगळ्या घरफोडी प्रकरणांमध्ये तब्बल ५ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. या सर्व प्रकरणांत अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
चाळीसगाव तालुका : मादुरणे येथे कपड्यांचा व्यवसाय करणारे किशोर नारायण पाटील यांच्या राहत्या घरात १५ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १६ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेली सोन्याची पोत, दोन बांगड्या व रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील करीत आहेत.
बोदवड तालुका : मनोर येथे शेती व्यवसाय करणारे विठ्ठल ओंकार शेळके यांच्या राहत्या घराचे कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून सोन्याची पोत, मनी-मंगळसूत्र, कानातील दागिने, चांदीच्या पाटल्या तसेच ५० हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संतोष चौधरी करीत आहेत.
पाचोरा तालुका : पिंपळगाव हरेश्वर येथे शेती व्यवसाय करणारे विष्णू काशिनाथ माळी यांच्या राहत्या घरात ९ डिसेंबर रोजी दुपारी अडीच ते १६ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेदरम्यान घराच्या मागील दरवाज्याचा आतील कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील व भिंतीला टांगलेल्या कापडी पिशवीतील ३ लाख ७५ हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.