

जळगाव : शहराला वाढत्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी शहराबाह्य रिंग रोड विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडण्यात आला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांनी यासंदर्भात केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले आहे.
पत्रात खासदार वाघ यांनी नमूद केले आहे की, शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि प्रदूषण ही गंभीर समस्या बनत आहे. या पार्श्वभूमीवर रिंग रोडची उभारणी अत्यावश्यक असून त्यामुळे औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क तसेच कृषी व्यापाराला मोठी चालना मिळू शकते. रिंग रोडमुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील ताण कमी होईल आणि शहरातून जाणाऱ्या बाह्य वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.
या प्रस्तावासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात यावा तसेच रिंग रोड प्रकल्पाला केंद्र सरकारच्या प्रमुख पायाभूत सुविधा योजनांमध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तांत्रिक सर्वेक्षण व वाहतूक तज्ज्ञांच्या अहवालाच्या आधारे हा प्रकल्प तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रिंग रोडसाठी एनएच-५३ (सूरत–नागपूर), एनएच-७५३एफ (बुरहानपूर–औरंगाबाद), एनएच-७५३जे (जळगाव–चाळीसगाव) हे राष्ट्रीय महामार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग व आंतर-जिल्हा मार्ग जोडण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.
जळगावचा सर्वांगीण विकास हा माझा प्राधान्यक्रम आहे. रिंग रोड झाल्यास वाहतूक, उद्योग, सुरक्षा आणि आर्थिक प्रवाहात मोठा बदल घडेल. शहराला याचा दीर्घकालीन फायदा होईल, असेही खासदार स्मिता वाघ यांनी पत्राद्वारे नमूद केले आहे.