Jalgaon police raid Kinhi MIDC arrests four| किन्ही MIDC मध्ये भुसावळ पोलिसांचा थरारक छापा, सात लाख मुद्देमालासह चौघे जेरबंद!

Jalgaon police raid Kinhi MIDC arrests four - ६२ ग्रॅम मेफेड्रोन (MD) ड्रग्ज, बुलेट अन् आयफोन जप्त; जिल्ह्यात ड्रग्ज माफियांमध्ये प्रचंड खळबळ
arrest
arrestFile Photo
Published on: 
Updated on: 

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांनी उगारलेल्या बडग्याला मोठे यश आले आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास किन्ही एमआयडीसी परिसरात धाडसी छापा टाकून ‘एम.डी.’ (मेफेड्रोन) ड्रग्जच्या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी ६२.२१ ग्रॅम एम.डी. पावडर, दोन दुचाकी आणि ४ महागडे मोबाईल असा एकूण ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चार तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, किन्ही एमआयडीसीच्या निर्जन परिसरात काही तरुण महागड्या दुचाकींवर संशयास्पदरीत्या थांबून अंमली पदार्थांची मोठी देवाणघेवाण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, भुसावळ तालुका पोलीस व एलसीबीच्या संयुक्त पथकाने ६ नोव्हेंबर रोजी पहाटे पावणे तीनच्या सुमारास संपूर्ण परिसराला वेढा घालून अचानक छापा टाकला. अंधाराचा फायदा घेऊन पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघा संशयितांना पोलिसांनी शिताफीने जागीच पकडले.

अटकेतील आरोपींची नावे :

१. रिशभ कुणाल खेडकर (वय १८, रा. कंडारी, भुसावळ)

२. प्रथमेश दिलीप आव्हाड (वय २७, रा. दादासाहेब रुपवते सोसायटी, भुसावळ)

३. शेख अफजल शेख रहेमतुल्ला (वय २६, रा. नसरंजी फाईल, भुसावळ)

४. असगरखान अनवरखान (वय ५७, रा. अयान कॉलनी, भुसावळ)

तपासणीत व्यापारी मात्रेतील ‘एम.डी.’ जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल २ लाख ४८ हजार ८४० रुपये किंमतीची ६२.२१ ग्रॅम घातक ‘मेफेड्रोन’ (MD) पावडर आढळून आली. कायद्यानुसार ही ‘कमर्शियल क्वांटिटी’ (व्यापारी मात्रा) मानली जाते. विशेष म्हणजे, यातील तब्बल ५५.३३ ग्रॅम एम.डी. एकट्या असगरखान अनवरखान याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. याशिवाय आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली रॉयल एनफिल्ड बुलेट व पल्सर दुचाकी (किंमत ₹३,२५,०००) तसेच आयफोन १६, आयफोन १३ सह एकूण चार महागडे मोबाईल (किंमत ₹१,५५,०००) असा एकूण ७ लाख २८ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा रजि. क्र. २२६/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क), २९ प्रमाणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

arrest
Jalgaon Burglary | जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; अडीच लाखांचा ऐवज लंपास

ही धडक कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, जळगावचे अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली. तरुणाईला विळखा घालणाऱ्या एम.डी. ड्रग्जच्या मोठ्या साठ्यासह तस्कर गजाआड झाल्याने भुसावळ परिसरातील ड्रग्ज माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

arrest
Jalgaon Bribe | जळगाव जिल्हा परिषदेत उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.