Jalgaon Bribe | जळगाव जिल्हा परिषदेत उपविभागीय अधिकाऱ्यासह कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात!

​रस्त्याच्या बिलासाठी लाच उकळताना ‘’ छापा; टेबलखालून देवाणघेवाण करताना दोघांना रंगेहाथ पकडले
Bribe News
Bribe News
Published on: 
Updated on: 

​जळगाव : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासावर डल्ला मारत ठेकेदारांच्या घामाच्या पैशांवर टक्केवारी लाटणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील भ्रष्ट साखळीचा आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पर्दाफाश केला. पिंप्री खुर्द (ता. धरणगाव) येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाच्या बिलावर स्वाक्षरी करून ते मंजुरीसाठी पुढे पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच उकळताना वर्ग-१ चे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) सतीष मनसुलाल शिसोदे आणि वर्ग-३ चे कनिष्ठ अभियंता (जेई) भागवत वसंता चवरे या दोघांना आज, सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या.

या कारवाईदरम्यान शिसोदे यांच्या अंगझडतीत ॲपलचा महागडा फोन आणि तब्बल ९१,६२० रुपयांची संशयास्पद रोकड मिळून आल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​आधी घेतले २० हजार, नंतर पुन्हा मागितली १.५ टक्के ‘कट कमिशन’!

​पिंप्री खुर्द (ता. धरणगाव) येथे २०२५-२६ या आर्थिक वर्षात तक्रारदार ठेकेदाराने ९ लाख ९० हजार ७६३ रुपयांचे गाव अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले होते. पूर्ण झालेल्या या कामाची मोजणी पुस्तिका (एमबी रेकॉर्ड) आणि बिले तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चवरे याने तक्रारदाराकडून यापूर्वीच २० हजार रुपये लाटले होते.

​काम पूर्ण होऊनही बिलाची फाईल पुढे सरकत नसल्याने तक्रारदार जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात पाठपुरावा करण्यासाठी गेले. त्यावेळी कनिष्ठ अभियंता चवरे याने थेट टक्केवारीची भाषा सुरू केली. बिलावर स्वतःची सही करून ते वरिष्ठ कार्यालयात मंजुरीसाठी पाठविण्यासाठी आणि उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्या नावावर एक लाख मागे दीड टक्का, म्हणजेच १५ हजार रुपयांची उघड लाच मागितली.

​एसीबीची पडताळणी अन् तडजोड; १० हजारांवर ठरला ‘सौदा’

​ठेकेदाराने या त्रासाला कंटाळून आजच (दि. २) थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने उपविभागीय अधिकारी कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी केली असता, कनिष्ठ अभियंता चवरे याने शिसोदे यांच्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. अखेर तडजोडीअंती १ टक्का प्रमाणे १० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.

​लाच स्वीकारताच एसीबीचा छापा, दोघांना कार्यालयातच घेतले ताब्यात

​कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम कनिष्ठ अभियंता भागवत चवरे याने पंचांसमक्ष स्वीकारली आणि लगेच ती केबिनमध्ये बसलेले उपविभागीय अधिकारी सतीष शिसोदे यांच्या हातात दिली. शिसोदे यांनी ती लाचेची रक्कम स्वतःकडे घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून दोघांना जागीच पकडले. त्यांच्याकडून लाचेची १० हजारांची रक्कम पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.

महागडे आयफोन अन् १ लाखाहून अधिक रोकड जप्त

​कारवाईनंतर एसीबी पथकाने दोघांची झाडाझडती घेतली असता अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे झाले. वर्ग-१ चे अधिकारी सतीष शिसोदे यांच्या अंगझडतीतून:

​ॲपल (iPhone) कंपनीचा महागडा मोबाईल

​९१,६२० रुपये इतकी संशयास्पद रोख रक्कम

​तसेच कनिष्ठ अभियंता भागवत चवरे याच्या अंगझडतीतून:

​विवो (Vivo) कंपनीचा मोबाईल

​२०,६०० रुपये रोख रक्कम मिळून आली.

​कार्यालयात ड्युटीवर असताना एवढी मोठी रोकड खिशात कशासाठी ठेवली होती, याबाबत एसीबी पथक आता सखोल चौकशी करत आहे.

​जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

​या लाचखोर अधिकाऱ्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) चे कलम ७ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल होताच अटकेची कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

​सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगावचे उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे (कॅम्प जळगाव) तसेच पोलीस हवालदार बाळू मराठे आणि महिला पोलीस नाईक संगीता पवार यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.