

जळगाव : जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, धरणगाव, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यांत चोरीच्या तीन घटनांमध्ये सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. धरणगाव तालुक्यात बंद घर फोडून रोकड व सोन्याची अंगठी चोरून नेण्यात आली, तर यावल तालुक्यात एकाच रात्री दोन घरांना लक्ष्य करण्यात आले. दुसरीकडे, मुक्ताईनगरात बँकेतून पैसे काढून दुचाकीने जाणाऱ्या शेतकऱ्याची एक लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवली. या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, संबंधित पोलिस ठाण्यांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
धरणगाव तालुक्यातील रोटवद येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाट आणि लोखंडी पेटीचे कोंडे तोडून कापडी पाकिटात ठेवलेली २९ हजार रुपयांची रोकड आणि १२ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अनुकबाई भावलाल पाटील (वय ६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल सुधीर चौधरी तपास करीत आहेत.
यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरांना लक्ष्य केले. भूषण वासुदेव सोळंके यांच्या घराच्या मागील खोलीचा लाकडी दरवाजा तोडून २० हजार रुपयांचे सोन्याचे डोरले आणि एक किलो वजनाचे, ६० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले.
त्यानंतर भूषण विलास सोळंके यांच्या घराच्या दरवाजाला ड्रिल मशीनने छिद्र पाडून चोरट्यांनी सहा हजार रुपयांची रोकड, १४ हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स तसेच अंधत्व प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र आणि महत्त्वाची ओळखपत्रे लंपास केली. या दोन्ही घटनांत एकूण एक लाख सहा हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन तपास करीत आहेत.
मुक्ताईनगर शहरात भरदिवसा बॅग लिफ्टिंगची घटना घडली. कोरडा येथील शेतकरी विजयकुमार देविदास पाटील (वय ४५) यांनी आयडीबीआय बँकेतून एक लाख रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी कापडी पिशवीत ठेवून दुचाकीच्या हँडलला लटकवली होती. बसस्थानक ते तहसील रोडदरम्यान महाजन पंपाजवळून जात असताना अज्ञात चोरट्याने दुचाकीवरील रोकड असलेली पिशवी लंपास केली.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक सुरेश मेढे तपास करीत आहेत. जिल्ह्यात घरफोड्या आणि रोकड चोरीच्या वाढत्या घटनांमुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.