

Criminals Arrested Jalgaon MIDC Police
जळगाव : शहरातील कासमवाडी परिसरात गावठी कट्टा आणि धारदार कोयता बाळगून दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी शिताफीने अटक केली. या धाडसी कारवाईत एकूण ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कासमवाडी परिसरात दोन तरुण घातक शस्त्रांसह फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने कासमवाडी ते नेरी नाका रोडवरील एकता चौकात सापळा रचला.
दरम्यान, एक मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन संशयितांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करून दोघांना पकडले. अटकेत घेतलेल्या आरोपींची ओळख रोहित गोपाळ कुंवर (वय २२, रा. कासमवाडी) आणि सागर रामा सोनवणे (वय २१, रा. आसोदा रोड, जळगाव) अशी आहे.
अंगझडतीदरम्यान एका आरोपीकडे गावठी बनावटीचा कट्टा, तर दुसऱ्याकडे लोखंडी कोयता आणि कट्ट्याचे रिकामे मॅगझिन आढळून आले. पोलिसांनी आरोपींकडून २० हजार रुपये किमतीचा कट्टा, ५० हजारांची ‘पल्सर’ मोटारसायकल, लोखंडी कोयता आणि मॅगझिन असा एकूण ७०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमातील कलम ३/२५, ४/२५ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, किरण चौधरी, रमाकांत साळुंखे आणि शशिकांत मराठे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
दरम्यान, न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी व पोकों योगेश घुगे करत आहेत.