

Lance Naik Rohit Patil
जळगाव : पारोळा तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी लान्स नायक रोहित नारायण पाटील (काटे) (वय ३०) या प्यारा कमांडो जवानाला नियमित प्रशिक्षणादरम्यान वीरमरण आले. हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात यमुना नदीवरील हथनीकुंड धरणात मंगळवारी (दि. १) सायंकाळी पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर गुरूवारी (दि. ३) दुपारी बारा वाजता धरणापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर जिंतजवळ रोहित पाटील यांचा मृतदेह आढळून आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जवानांचे पूरपरिस्थितीत बचावकार्याचे प्रशिक्षण सुरू होते. यावेळी रोहित पाटील यांच्यासह पाच जवानांनी हेलिकॉप्टरमधून हथनीकुंड धरणाच्या पाण्यात उडी घेतली. त्यानंतर सर्वजण एका बोटीत चढले. मात्र, बोटीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत वाहू लागली.
परिस्थिती गंभीर झाल्याने पाचही जवानांनी पुन्हा पाण्यात उड्या मारल्या. यातील तीन जवानांनी पोहत सुरक्षितपणे नदीकाठ गाठला; मात्र पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने दोन जवान वाहून गेले. यापैकी एका जवानाचा मृतदेह मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सापडला. तर रोहित पाटील यांचा शोध घेण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बचाव पथकाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत होती. अखेर गुरूवारी दुपारी त्यांचा मृतदेह जिंतजवळ आढळून आला.
रोहित पाटील हे १८ मीडियम रेजिमेंट, द आर्टिलरी या युनिटमध्ये १८ सप्टेंबर २०१७ पासून कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा अमळनेर तालुक्यातील वावडे येथील हर्षदा यांच्याशी विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि अवघ्या ११ महिन्यांचा मुलगा हर्षदीप ऊर्फ रुद्र असा परिवार आहे. त्यांचे वडील नारायण रामलाल पाटील-काटे हे शेतकरी असून आई योजनाबाई पाटील गृहिणी आहेत. भाऊ मनोज पाटील-काटे विवाहित आहे.
रोहित पाटील यांचे पार्थिव विमानाने नाशिक येथे आणण्यात आले असून, तेथून रस्तेमार्गे कोळपिंप्री येथे आणण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत पार्थिव गावात पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोळपिंप्री येथे पोहोचून वीरमरण आलेल्या जवानाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.