

जळगाव: जिल्ह्यात तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात जळगाव बायपासवरील ‘आरओबी’ (रेल्वे ओव्हर ब्रिज) खचल्याची धक्कादायक घटना घडली होती. अवघ्या एक वर्षापूर्वीच या महामार्गाचे काम पूर्ण झाले होते. 'लवकरच पूल पूर्ववत सुरू करू' अशा घोषणा देणाऱ्या 'न्हाई'च्या (National Highways Authority of India) अधिकाऱ्यांकडून अजूनही या रस्त्यावर केवळ 'टेस्टिंग'चाच खेळ सुरू आहे. या संथ कारभारामुळे बायपासने जाणारी सर्व अवजड वाहतूक अजूनही शहराच्या मध्यवर्ती भागातून धडधडत आहे. परिणामी, निष्पाप जळगावकरांचा जीव हातात आला असून, गेल्या काही दिवसात झालेली अपघातात दोन जणांचा मृत्यू रस्त्यांवर झाले आहे.
बायपास बंद असल्याने राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक थेट शहरातून वळवण्यात आली आहे. याच मुख्य रस्त्यावर शहरातील अनेक प्रमुख शाळा आणि महाविद्यालये आहेत. दररोज हजारो विद्यार्थी याच मार्गाने ये-जा करतात. प्रचंड गर्दीच्या वेळीही या मार्गावरून सुसाट धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला थेट धोका निर्माण झाला आहे. नुकत्याच घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला असून, प्रशासन आणखी किती बळींची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
खचलेला हा पूल रेल्वे ओव्हर ब्रिज आहे. सुदैवाने पहिल्या घटनेत रेल्वे ट्रॅकवर मोठा अपघात टळला; परंतु यदाकदाचित भविष्यात हा 'आरओबी' पुन्हा खचला आणि खालील ट्रॅकवरून रेल्वे जात असल्यास अतिशय भीषण अपघात घडू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. अवघ्या वर्षभरातच पहिल्या पावसात पुलाची झालेली दयनीय अवस्था पाहता कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत आता थेट प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, बायपासचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, 'न्हाई'च्या अधिकाऱ्यांकडून या प्रस्तावात नक्की काय नमूद करण्यात आले आहे, याबाबत मौन पाळले जात असून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही. त्यामुळे ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.
"पुलाची सध्या टेस्टिंग सुरू आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. टेस्टिंगसाठी सध्या या पुलावरून एकतर्फी वाहतूक सोडण्यात येत आहे. मात्र, अजूनही पूल पूर्ण ताकतीने आणि क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झालेला नाही."
— श्री. साळुंखे (उपकार्यकारी संचालक, न्हाई जळगाव)