

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या सातत्यपूर्ण आणि प्रचंड दरवाढीमुळे सर्वसामान्य जळगावकरांचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोलमध्ये ९० पैसे तर डिझेलच्या दरात तब्बल ९४ पैशांची वाढ झाली असून, यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव दुप्पट झाले आहेत. एकीकडे इंधनाचा भडका आणि दुसरीकडे भाजीपाल्याची कडकड यामुळे जळगाव, भुसावळसह संपूर्ण जिल्ह्यातील गृहिणींचे आणि वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे.
पेट्रोल ११० तर डिझेल ९७ रुपयांवर
आजच्या नव्या दरात मध्ये पेट्रोल मध्ये 90 पैसे तर डिझेलचा दरात 94 पैसे एवढी वाढ झाली आहे. गेल्या अवघ्या दहा दिवसांत जळगाव जिल्ह्यात पेट्रोल ४ रुपये ९४ पैसे तर डिझेल ४ रुपये ९९ पैशांनी महागले आहे. दरवाढीनंतर जळगावात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ११० रुपये ४४ पैसे तर डिझेलचे दर ९७ रुपये ०१ पैशांवर पोहोचले आहेत. या इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढला असून त्याचा थेट फटका थेट जळगावकरांच्या ताटातील भाजीला बसत आहे.
भाजीपाल्याचा कडकडाट! (दर किलोमध्ये)
इंधन दरवाढीमुळे अवघ्या आठवडाभरात भाजीपाल्याचे दर कसे गगनाला भिडले आहेत, याचे वास्तव खालील तक्त्यावरून स्पष्ट होते.
मागील आठवड्याचे दर आजचे दर
बारीक मिरची. २५ ते ३० , ६५ ते ७०
जाड मिरची. १५ ते २५ , ३५ ते ४०
भेंडी. २०. ४० , ५०
मेथी. ३०. ६०
कोथिंबीर. २० ते ३० , ६०
टमाटे. २०. ४०
बटाटे. १०. २० ते २५
कांदे. १० ते १५. २०
बाजारात कांद्याची गोणी साडेचारशे रुपयांच्या पुढे विकली जात आहे.
शेतकऱ्यांची कोंडी; मजुरी आणि भाड्यात मोठी वाढ
डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा माल शेतातून बाजार समितीपर्यंत आणणे अवघड झाले आहे. आधी ज्या पन्नी साठी शेतकऱ्यांना २० ते ३० रुपये मोजावे लागत होते, त्यासाठी आता तब्बल ७० रुपयांपर्यंत मजुरी आणि वाहतूक खर्च द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी आपला माल बाजारात आणण्यास कचरत असून, यामुळे आवक घटली आहे.
"पेट्रोलची दरवाढ जशी होते आहे, तशी प्रत्येक गोष्टीची महागाई वाढत आहे. अजून मुलांच्या शाळा सुरू झालेल्या नाहीत, शाळा सुरू झाल्यावर बस किंवा रिक्षाचे भाडेही वाढेल. अशा वेळी सामान्य कुटुंबांनी जगायचे कसे? परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे."
— सागर पाटील (नागरिक, जळगाव)
"डिझेल टंचाई आणि दरवाढीचा दुहेरी फटका!" > "पेट्रोल-डिझेलच्या वाढीमुळे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाची आवक खूप कमी झाली आहे. माल आणणाऱ्या गाड्यांना वेळेवर डिझेल मिळत नाहीये आणि मिळाले तर त्याचे भाव रोज वाढत आहेत. शेतकऱ्यांना ज्या पन्नीसाठी आधी ३० रुपये लागायचे, तिथे आता ७० रुपये मोजावे लागत आहेत. याचा सरळ फटका शेतकरी आणि ग्राहकांना बसत आहे."
— उमेश चौधरी (अध्यक्ष, भुसावळ बाजार समिती)