

जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपली पहिली विजयाची मोहोर उमटवली आहे. भाजपच्या माजी महानगराध्यक्ष उज्वला बेंडाळे यांची प्रभाग क्रमांक १२ 'ब' मधून बिनविरोध निवड झाली आहे. अर्ज छाननीच्या दिवशीच भाजपच्या गोटात विजयाचा जल्लोष पाहायला मिळत असून, अधिकृत घोषणा आता केवळ औपचारिकता उरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उज्वला बेंडाळे यांनी प्रभाग १२ 'ब' मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराने तीन वेगवेगळ्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रे भरल्याची तांत्रिक चूक समोर आली. अर्ज छाननी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या त्रुटीमुळे समोरच्या उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवला. परिणामी, या प्रभागात बेंडाळे या एकमेव वैध उमेदवार राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
निवडणुकीची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच भाजपने आपले खाते उघडले आहे. उज्वला बेंडाळे या अनुभवी नेत्या असून त्यांनी यापूर्वी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, निवडणुकीच्या सुरुवातीलाच पक्षाला एक मानसिक आघाडी मिळाली आहे.
उज्वला बेंडाळे यांची निवड निश्चित झाली असली, तरी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार याची अधिकृत घोषणा मतमोजणीच्या दिवशीच केली जाणार आहे. मात्र, राजकीय वर्तुळात आतापासूनच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.