

जळगाव : शहरात जुन्या वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना जळगाव महानगरपालिकेजवळील गोलाणी मार्केट परिसरात घडली. जखमी तरुणाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक अर्जांची छाननी सुरू असताना, गर्दीच्या ठिकाणी कांचन नगर येथील शुभम रवींद्र सोनवणे याने धनाजी नाना महाविद्यालयाच्या मागे राहणाऱ्या यश (पूर्ण नाव अद्याप समजले नाही) याच्यावर चाकूने वार केल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.