जळगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारीका म्हणून काम केलेल्या सेवानिवृत्त परिचारिकेचा ३० लाखासाठी गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह शिरपूर तालुक्यातील तापी नदी पात्रात फेकून देण्यात आला. स्नेहलता अनंत चुंबळे ( वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा परिषदेतील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, खोटे नगर येथे राहणाऱ्या. स्नेहलता चुंबळे या धरणगाव तालुक्यातील साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारीका होत्या. त्या एप्रिल २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या मुलगा समीर संजय देशमुख यांच्याकडे नाशिकला राहत होत्या. मुलगा समीर याला फ्लॅट घ्यायचा असल्याने स्नेहलता यांनी ३० लाखाची रक्कम २० ऑगस्टला रिंग रोडवरील बँकेतून काढली होती. पोलिसांनी याच माहितीच्या आधारावर बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. तालुका पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्नेहलता यांच्यासोबत जिजाबराव पाटील आढळून आले. ते साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता मृत स्नेहलता चुंबळे यांना खोटेनगर स्टॉपला सोडल्याचे त्याने सांगितले. मात्र पोलिसांनी जिजाबराव पाटील याची फोन कॉलचे डिटेल तपासणी केल्यावर ते विजय निकम यांच्या सर्वाधिक संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर दोघांनीही खुनाची कबुली दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी महिलेसोबत रिंगरोडवरील बँकेतून ३० लाखांची रक्कम काढल्यानंतर त्यांच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर वाहनातच महिलेचा गळा आवळून खून केला. त्यानंतर महिलेचा मृतदेह शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील तापी नदीच्या पुलावरुन नदीत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार फ्लॅट घेण्यासाठी महिलेला ३० लाख रुपये काढायचे होते. हे जिजाबराव पाटील याला माहिती होते. महिलेसोबत एकाच ठिकाणी कामाला असल्याने जिजाबराव हा महिलेसोबत पैसे काढायला गेला होता. फ्लॅट घेताना कॅश रक्कम दिली तर फ्लॅट कमीमध्ये मिळेल, असे सांगत जिजाबरावने महिलेचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्या पैशांसाठी महिलेचा खून केल्यानंतर महिलेचा मृतदेह तापी नदीत फेकून दिला. आता हा मृतदेह फेकून १५ दिवस उलटले असून ही अजूनही मृतदेह सापडलेला नाही. पोलिसांना मृतदेह शोधण्याचे एक आव्हान आहे. त्यांनी मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे. या दरम्यान मुलगा समीर संजय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा व त्यांचे सहकारी करीत आहे.