राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनामागे कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी असली, तरी त्याची मुळे आंदेकर टोळीतील फूट आणि नाना पेठेतील साम्राज्याच्या वर्चस्वापर्यंत पोहचत आहेत. आंदेकर टोळीला पाच दशकांचा रक्तरंजित इतिहास आहे.
किरकोळ हाणामारीच्या गुन्ह्याने 1976 मध्ये त्याला सुरुवात झाली. शहरात इतरही गुंडांच्या टोळ्या होत्या. मटका, जुगार, गावठी दारूचे अड्डे, याद्वारे पैसे कमावणे, हे त्यांचे उद्योग होते. वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्यात चाकू, तलवारी, सायकलच्या चेन व सोडावॉटरच्या बाटल्यांचा वापर करीत हाणामार्याही होत असत. अशाच पद्धतीने स्वतःची दहशत निर्माण करीत बाळकृष्ण ऊर्फ बाळू आंदेकरने इतर टोळ्यांचे वर्चस्व मोडीत काढत गुन्हेगारी जगतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
कुख्यात बाळू आंदेकर व प्रमोद माळवदकर हे दोघेही सुरुवातीस एकत्रच काम करीत. परंतु, अंतर्गत वर्चस्वाच्या वादातून 1980 च्या दशकात कसबा पेठेतील प्रमोद माळवदकर याने आंदेकर टोळीतून फुटून स्वतःची टोळी उभी केली व आंदेकरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली. त्यातूनच आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकर याच्या वडिलांचा खून केला. त्याचा बदला घेण्यासाठी माळवदकर टोळीने 17 जुलै 1984 रोजी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात बाळू आंदेकर याचा खून केला. त्यातून आंदेकर-माळवदकर टोळीतील गँगवॉरचा भडका उडाला. त्यामध्ये दोन्ही टोळ्यांतील मिळून सहा कुख्यात गुंडांचा खात्मा झाला. जवळपास दहा वर्षांपर्यंत हे गँगवॉर सुरूच होते.
या टोळ्यांचा नायनाट करून शहर दहशतमुक्त करण्यासाठी पोलिस दलही प्रयत्नशील होते. अशातच काळेवाडी परिसरात लपून बसलेल्या प्रमोद माळवदकरचा सुगावा पोलिसांना लागला. 19 नोव्हेंबर 1997 रोजीच्या पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने स्कूटरवरून प्रवास करणार्या प्रमोद माळवदकरचा पाठलाग करीत त्याचा एन्काउंंटर केला. माळवदकरच्या निधनानंतर माळवदकर टोळीच नामशेष झाली.
माळवदकर टोळी संपुष्टात आल्यानंतर शहरावर आंदेकर टोळीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या टोळीची सूत्रे सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्याकडे गेली. गुन्हेगारी जगतावर वर्चस्व राखणारे हे गुंड 1997 मध्ये महापालिकेच्या निवडणुकांद्वारे राजकारणात उतरले. या टोळीशी संबंधित चार जण या निवडणुकीने महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतरच्या वर्षातच 1998-99 मध्ये वत्सलाअक्का आंदेकर पुण्याच्या महापौरपदी विराजमान झाल्या. गुन्हेगारी जगताशी त्यांनी संबंध कमी केले असले, तरी आंदेकर टोळीच्या कारवाया कमी झाल्या नाहीत.
विरोधकांना मारण्यासाठी गुंड पाठविणे, त्यासाठी सुपारी देणे, असे प्रकार आंदेकर टोळीकडून सर्रास होत होते. त्यातूनच एका खून प्रकरणात सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर काही काळ आंदेकर टोळीचा दबदबा कमी झाला. बंडू आंदेकर कारागृहात असताना त्याची मुले वनराज व कृष्णा हे टोळी चालवू लागले. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी 2009 मध्ये पोलिसांनी वनराज आणि कृष्णा आंदेकर या दोन्ही भावांना तडीपार केले.
जन्मठेपेची शिक्षा भोगून बंडू आंदेकर बाहेर आल्यावर या टोळीचे वर्चस्व पुन्हा वाढू लागले. त्याचवेळी इतर टोळ्याही आपल्या अस्तित्वासाठी झगडत होत्या. त्यामुळे या टोळ्यांचे आंदेकर टोळीशी खटके उडू लागले. त्यातून परस्परविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, खंडणीवसुली असे गुन्हे दाखल होऊ लागले. पोलिसांनी बंडू आंदेकर याच्यावर तीनवेळा मोक्काअंतर्गत कारवाई केली.
आंदेकर टोळीवर अनेक गुन्हे दाखल झाले असले, तरी त्यांच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी नागरिक पुढे येत नसत. आलेच तर कोर्टात ते टिकत नसत. त्यामुळे अनेक खटल्यांमध्ये पुराव्याअभावी त्यांची सुटका होत होती. आंदेकर टोळीने नव्याने आलेल्या अनेक गुंडांच्या टोळ्यांशी संघर्ष केला. त्यात अतुल कुडले, सुरज ठोंबरे आदींचा समावेश आहे. तथापि, वनराज आंदेकर याचा खून हा टोळीयुद्धातून नव्हे, तर कौटुंबिक वादातून व अंतर्गत कलहातून झाल्याची माहिती पुढे आली आहे.