

Livestock Care Jalgaon
जळगाव : एरंडोल तालुक्यातील गालापूर येथे अप्रमाणित पशुखाद्यामुळे ३५ गाई-म्हशींना अन्नबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. मात्र, पशुसंवर्धन विभागाच्या '१९६२' या आपत्कालीन हेल्पलाइनच्या तातडीच्या प्रतिसादामुळे सर्व बाधित पशुधनावर वेळेत उपचार करण्यात आले आणि संभाव्य मोठी जीवितहानी टळली.
गालापूर येथील पशुपालक हमीर गबाजी गवळी यांच्या ३५ गाई-म्हशींनी बाजारातून आणलेले अप्रमाणित पशुखाद्य खाल्ल्यानंतर अचानक प्रकृती बिघडल्याचे दिसून आले. काही जनावरांची अवस्था गंभीर झाल्याने पशुपालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या परिस्थितीत गवळी यांनी भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या १९६२ या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधला. माहिती मिळताच पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथील राज्यस्तरीय कॉल सेंटरने तातडीने स्थानिक पशुवैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधून घटनेची माहिती फिरत्या पशुवैद्यकीय पथकाला दिली.
दीड तासात घटनास्थळी पोहोचले वैद्यकीय पथक
माहिती मिळताच फिरत्या पशुवैद्यकीय पथकाचे डॉ. यशवंत धावसे यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पशुधन पर्यवेक्षक सुदर्शन पाटील आणि वाहनचालक भूषण कोळी यांच्यासह त्यांनी अवघ्या दीड तासात घटनास्थळी पोहोचून बाधित जनावरांची तपासणी केली.
प्राथमिक तपासणीत अप्रमाणित पशुखाद्यामुळे विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पथकाने युद्धपातळीवर उपचार सुरू केले. सोडियम बायकार्बोनेट, चारकोल, अट्रॉपीन सल्फेट, आर.एल., सी.पी.एम. आणि बी-कॉम्प्लेक्स यांसारख्या औषधांचा वापर करून जनावरांवर उपचार करण्यात आले.
सलग चार दिवस उपचार सुरू ठेवण्यात आले. योग्य निदान, वेळेवर उपचार आणि सततच्या वैद्यकीय देखरेखीमुळे सर्व ३५ गाई-म्हशींची प्रकृती सुधारली असून त्या आता सुरक्षित असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. या संपूर्ण मोहिमेदरम्यान सहाय्यक आयुक्त डॉ. योगेश महाले आणि डॉ. पी. आर. पारखी यांचे मार्गदर्शन लाभले.
याबाबत माहिती देताना डॉ. यशवंत धावसे म्हणाले, "१९६२ हेल्पलाइनवरून संदेश प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. अप्रमाणित पशुखाद्यामुळे विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार आवश्यक औषधोपचार करून सलग चार दिवस जनावरांवर उपचार करण्यात आले. सध्या सर्व बाधित पशुधन सुरक्षित असून त्यांची प्रकृती स्थिर आहे."
या घटनेमुळे पशुपालकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत १९६२ हेल्पलाइन किती प्रभावी आणि उपयुक्त ठरू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
१९६२ ही पशुवैद्यकीय आपत्कालीन सेवा राज्यातील पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. राज्यातील सर्व पशुपालकांनी पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १९६२ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा. पशुसंवर्धन विभाग त्यांच्यापर्यंत जलद, गुणवत्तापूर्ण व प्रभावी पशुवैद्यकीय सेवा पोहोचविण्यास कटिबद्ध आहे.
- डॉ. किरण पाटील, आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे