Jalgaon politics | विजयाचे गणित ‘क्रमांकावर’ बदलणार का?

भाजपाला 316 चा जादुई आकडा गाठता येणार?
Election Voting
Election VotingPudhari
Published on
Updated on

नरेंद्र पाटील

जळगाव : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत वरकरणी महायुतीत सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र दिसत असले, तरी पडद्यामागील राजकीय समीकरणे आणि गटबाजी मतदानाच्या दिवशी परिणाम दाखवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजप महायुतीच्या बळावर विजयाचा दावा करत असताना मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात ठाण मांडले असून आमदार मंगेश चव्हाण देखील मतदारांशी संपर्क साधण्यात व्यस्त आहेत.

विजयासाठी आवश्यक असलेला 316 मतांचा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजप उमेदवाराला शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या मतांचे सहकार्य अत्यावश्यक मानले जात आहे. भाजपाचे स्वतःचे 249 मतदान आहे तर शिंदेसेना याच्याकडे 165 मतदान आहे तर अजित पावर गटाकडे 19 मतदान आहे.असे महायुतीचे 433 मतदान होते.

Election Voting
Solapur News : विधान परिषदेची निवडणूक जाहीर; भाजपचे डझनभर इच्छुक

मात्र जळगाव जिल्ह्यात शिंदे गटातील बंडखोरीमुळे महायुतीसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. बंडखोर उमेदवारांनीही नगरसेवकांशी संपर्क वाढवून पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील नगरसेवक एकजुटीने मतदान करतात का, तसेच विविध आघाड्या आणि अपक्ष 108 नगरसेवकांचा कौल कोणाला मिळतो, यावर निकालाचे गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवार अपक्ष आणि आघाड्या मतांसाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपचे उमेदवार नंदू महाजन यांचे नाव थेट पक्षश्रेष्ठींकडून निश्चित झाल्याने काही इच्छुकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी उघडपणे दिसत नसली तरी तिचे पडसाद मतदानपेटीत उमटतील का, हा चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्यालयात जाऊन त्यांच्या उमेदवारांची माघार निश्चित करण्यात भूमिका बजावली. मात्र अजित पवार गटातील नगरसेवक प्रत्यक्ष मतदानात भाजपाला कितपत साथ देतील, याबाबत अद्याप साशंकता कायम आहे.

Election Voting
Jalgaon MLC Election | जळगावात उमेदवारीच्या घोषणेपूर्वीच भाजपमध्ये 'गृहकलह'; गटबाजी शिंदेसेनेच्या पथ्यावर पडणार?

बैठकीदरम्यान राजू वानखेडे यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि त्यातून समोर आलेली स्थानिक कार्यकर्त्यांची अस्वस्थता यामुळेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. "ठरल्याप्रमाणेच होईल," असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला असला, तरी मतदानाच्या दिवसापर्यंत हे समीकरण कायम राहते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकूणच विजयाचे गणित भाजपाच्या बाजूने असल्याचा दावा केला जात असला, तरी पसंतीक्रमाच्या मतदान पद्धतीत पहिल्या पसंतीची मते कोणाला मिळतात आणि दुसऱ्या पसंतीचा फायदा कोणाला होतो, यावर अंतिम निकाल अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ पक्षीय ताकद नव्हे, तर मतदानातील क्रमांकांचे गणितही निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

Election Voting
Jalgaon Politics | जळगावात 'महायुती'तच रणकंदन? पालकमंत्र्यांच्या लेकाचे 'दंड' तर भाजपचा 'अमोल' पेच!

पक्षनिहाय मतदारांची संख्या...

  • भाजप - २४९

  • शिंदेसेना - १६५

  • राष्ट्रवादी अजित पवार गट - १९

  • राष्ट्रवादी शरद पवार गट - ४१

  • उद्धव सेना - २३

  • कॉग्रेस - २२

  • एमआयएम - ०३

  • अपक्ष - ४४

  • विविध आघाडी - ६४

  • एकूण - ६३०

  • महायुती 433

  • आघाडी. 89

  • अपक्ष व आघाड्या 108

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news