

Jalgaon Vidhan Parishad Election Bjp Internal Rift
जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे, तसतसे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचे फटाके फुटू लागले आहेत. नेत्यांमधील कुरघोडीचे डावपेच चव्हाट्यावर आले आहेत. भाजपमधील या तीव्र अंतर्गत गटबाजीचा थेट फायदा महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाला मिळणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सध्या भाजपमधून उमेदवारीसाठी जी नावे आघाडीवर आहेत, त्यावरूनच पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन वेळा भाजपसोबत थेट बंडखोरी करून महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शड्डू ठोकणारे अमोल शिंदे यांचे नाव सध्या विधान परिषदेसाठी चर्चेत आहे. तर दुसरीकडे, नुकत्याच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या डॉ. केतकी पाटील यांच्या नावावरही पक्षात जोरदार खल सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन एकनिष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून, वारंवार बंडखोरी करणाऱ्यांना आणि ऐनवेळी पक्षात आलेल्या आयारामांना थेट संधी दिली जाणार का? असा संतप्त सवाल भाजपच्या जुन्या आणि निष्ठावंत पदाधिकाऱ्यांकडून विचारला जात आहे.
नाराजी एवढ्यापुरतीच मर्यादित नसून, चर्चेत असलेल्या नंदकुमार अडवाणी आणि नंदकिशोर महाजन यांच्या नावांनाही पक्षातील एका गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी विविध नेत्यांकडून अंतर्गत पातळीवर जोरदार कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असले, तरी सध्या भाजपमध्ये 'वेट अँड वॉच'ची परिस्थिती असून इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
भाजपमध्ये सुरू असलेल्या या अंतर्गत यादवीवर शिवसेना शिंदे गटाने अत्यंत बारीक लक्ष ठेवले आहे. जळगावमधील जागेवर शिंदे गटाने आधीच आपला दावा ठोकला आहे. जर भाजपमधील अंतर्गत गटबाजी अशीच उफाळत राहिली आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश आले, तर या संपूर्ण गोंधळाचा फायदा घेण्यासाठी शिंदे गट पूर्ण ताकदीने पुढे येऊ शकतो व ना. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांना संधी मिळू शकते.