

सोलापूर : सोलापूरसह राज्यातील 17 जिल्ह्यांतून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीसाठी भाजपकडे डझनभर इच्छुक उमेदवार आहेत. उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. माजी आ. प्रशांत परिचारक, माजी आ. राजेंद्र राऊत की अन्य नेत्यांची वर्णी लागणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे.
यंदा सोलापूर जिल्ह्यातून या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार निवडणुकीसाठी एकूण 501 सदस्य मतदान करणार आहेत. महायुतीमधील भाजप 262, शिवसेना (एकनाथ शिंदे) 71, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 47 असे सर्व मिळून महायुतीचे 380 सदस्य आहेत; तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 27, काँग्रेस 19, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 34 असे एकूण फक्त 70 संख्याबळ आहे. अपक्ष चार आणि स्थानिक आघाडीचे 47 सदस्य आहेत. त्यामुळे या जागेवर महायुतीकडे संख्याबळ आहे. परंतु भाजपकडे संख्याबळ अधिक असल्याने मित्रपक्षांना ही जागा न सोडता स्वत लढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाने सोलापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर या विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे गट, अन्य अपक्ष आघाड्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत शिंदे सेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महापलिका पक्षीय बलाबल
भाजप ................... 87
एमआयएम ...............08
शिवसेना शिंदे गट ........04
काँग्रेस ...................02
राष्ट्रवादी शरद पवार ......01
झेडपी पक्षीय बलाबल
भाजप..................... 38
राष्ट्रवादी अजित पवार.....11
राष्ट्रवादी शरद पवार.......05
शिवसेना (शिंदे गट) ......08
शेकाप......................03
करमाळा स्थानिक
आघाडी ....................02
तीर्थक्षेत्र आघाडी........... 01