

Jalgaon District Co-Operative Bank
जळगाव : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मोठी संस्था असलेल्या दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले. बँकेच्या एकूण २१ जागांसाठी २९ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ३० नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध राजकीय गटांकडून उमेदवारांची जुळवाजुळव, मतदारांचे गणित आणि संभाव्य आघाड्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही दिग्गज नेत्यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पर्याय म्हणून पुढे केले जात असल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या सहभागामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन, आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, माजी मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी पाटील आणि जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष तथा आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील यांचे ठराव दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार मंगेश चव्हाण आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचेही ठराव पहिल्यांदाच दाखल झाल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होणे, छाननी आणि माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :
उमेदवारी अर्ज दाखल करणे : २६ ते ३० ऑक्टोबर, सकाळी ११ ते दुपारी ३
अर्जांची छाननी : २ नोव्हेंबर, सकाळी ११ वाजता
वैध उमेदवारांची यादी : ३ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : ३ ते १७ नोव्हेंबर, दुपारी ३ वाजेपर्यंत
चिन्हवाटप व अंतिम उमेदवार यादी : १८ नोव्हेंबर, सकाळी ११ वाजता
मतदान : २९ नोव्हेंबर, सकाळी ८ ते सायंकाळी ४
मतमोजणी व निकाल : ३० नोव्हेंबर, सकाळी ९ वाजल्यापासून
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांमध्ये १५ तालुका प्रतिनिधी आणि सहा राखीव जागांचा समावेश आहे. प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा संयुक्त शेती संस्थांच्या प्रतिनिधींसाठी १५ जागा आहेत.
राखीव जागांमध्ये महिलांसाठी दोन, अनुसूचित जाती-जमातींसाठी एक, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गासाठी एक, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एक, तर इतर शेतीसंस्था, पतसंस्था, ग्राहक संस्था आणि पगारदार संस्थांच्या प्रतिनिधीसाठी एक जागा आहे.
जिल्हा बँकेवरील नियंत्रणाला सहकार क्षेत्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे स्थान असल्याने नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र, दुसरीकडे तळागाळातील सहकारी संस्थांकडून ठराव दाखल करण्याचा प्रतिसाद मर्यादित असल्याचे चित्र समोर आले आहे.
जिल्ह्यातील एकूण ८७६ विकास सोसायट्यांपैकी केवळ २६० सोसायट्यांचे ठराव दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच इतर संस्था मतदारसंघातूनही २६० प्रस्ताव दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. उर्वरित संस्थांचे ठराव दाखल होणे बाकी असल्याने निवडणुकीतील मतदारसंघनिहाय चित्र महत्त्वाचे ठरणार आहे.
उमेदवारी अर्ज, ठरावांची वैधता, छाननी आणि माघारीनंतर प्रत्यक्ष लढतींचे स्वरूप स्पष्ट होईल. त्यामुळे २९ नोव्हेंबरच्या मतदानापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोणती राजकीय समीकरणे आकाराला येतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.