

Jamner Pahur Police Arrest Thieves
जळगाव : जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातून शेतकऱ्याची बैलजोडी चोरून नेणाऱ्या टोळीचा पहूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सोनाळा येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, चोरीची बैलजोडी विकत घेणाऱ्या सुनसगाव येथील व्यापाऱ्यावरही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी बैलजोडी आणि चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
टेम्पोतून बैलजोडी लंपास
पिंपळगाव गोलाईत येथील गट क्रमांक १०७ मधील शेतातून ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मावळी जातीची पांढरी बैलजोडी चोरीला गेली होती. अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी टेम्पोत भरून नेली होती. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चौकशीतून टोळीचा उलगडा
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहूरचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांनी तपासासाठी पथके रवाना केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संजय प्रल्हाद पाटील आणि ज्ञानेश्वर गणपत पाटील (दोघेही रा. सोनाळा, ता. जामनेर) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांनी साथीदार दिनेश उर्फ टेलर जगन्नाथ पाटील आणि ईश्वर कडू पाटील यांच्या मदतीने बैलजोडी चोरल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरीची बैलजोडी सुनसगाव येथील व्यापाऱ्याला विकल्याचेही तपासात समोर आले.
व्यापाऱ्याच्या शेतातून बैलजोडी हस्तगत
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सुनसगाव येथे जाऊन पिंटू उर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे याच्या शेतातून बैलजोडी हस्तगत केली. बैलजोडीची किंमत १ लाख ५ हजार रुपये, तर टेम्पोची किंमत १ लाख ८० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, उपनिरीक्षक गणेश सुस्ते, हवालदार दीपक पाटील, पोलीस कर्मचारी ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी, वैभव देशमुख आणि वाहनचालक हेमंत सोनवणे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास हवालदार दीपक पाटील करीत आहेत.