Jalgaon Cyber Crime | मोबाईल हरवला अन् बँक खाते रिकामे! वृद्ध शेतकऱ्याला १.७२ लाखांचा गंडा

हरवलेल्या मोबाईलचा सायबर भामट्याने केला गैरवापर; धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल
Dharangaon Mobile Theft Fraud
Dharangaon Mobile Theft FraudPudhari
Published on: 
Updated on: 

Dharangaon Mobile Theft Fraud

जळगाव : मोबाईल हरवल्यानंतर त्याचा गैरवापर करून बँक खात्यातून तब्बल १ लाख ७१ हजार ९९६ रुपये परस्पर काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार धरणगाव तालुक्यातील पाथराड बुद्रुक येथे उघडकीस आला आहे. गोकुळ भिकन लंके (वय ६४) या वृद्ध शेतकऱ्याला सायबर भामट्याने गंडा घातला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजीपाला खरेदीदरम्यान मोबाईल गहाळ

गोकुळ लंके हे ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास पिंप्राळा येथून भाजीपाला खरेदी करून परतत होते. यावेळी ते पाळधी येथील साई कृषी केंद्राजवळ थांबले असता, त्यांच्या खिशातील मोबाईल हरवल्याचे लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र मोबाईल मिळून आला नाही.

Dharangaon Mobile Theft Fraud
Jalgaon Bullock Theft | बैलचोरांची टोळी पहूर पोलिसांच्या जाळ्यात; खरेदीदारालाही अटक

त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी त्यांनी हरवलेल्या मोबाईल क्रमांकाचे दुसरे सिमकार्ड घेऊन ते अन्य मोबाईलमध्ये सुरू केले. सिमकार्ड कार्यान्वित होताच त्यांच्या मोबाईलवर बँकेच्या व्यवहारांचे एकापाठोपाठ तीन संदेश आले. खात्यातून पैसे काढल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.

पाच व्यवहारांतून पैसे लंपास

लंके यांनी तातडीने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पाळधी शाखेत जाऊन खात्याची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या खात्यातून ४९ हजार ९९८ रुपये, ४९ हजार ९९८ रुपये, ५० हजार रुपये, २० हजार रुपये आणि दोन हजार रुपये अशा पाच व्यवहारांतून एकूण १ लाख ७१ हजार ९९६ रुपये काढून घेतल्याचे उघड झाले.

हरवलेल्या मोबाईलचा वापर करून अज्ञात व्यक्तीने बँक खात्यातील रक्कम परस्पर काढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल

आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लंके यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Dharangaon Mobile Theft Fraud
Jalgaon water scarcity news|वरुणराजाने पाठ फिरवली अन् जळगाव जिल्ह्याची ‘तहान’ वाढली; भूजल पातळी तब्बल १.४० मीटरने खालावली!

नागरिकांनी घ्यावी खबरदारी

मोबाईल हरवल्यास तातडीने सिमकार्ड बंद करावे, बँकेला कळवून मोबाईल बँकिंग सेवा सुरक्षित करावी आणि आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवावे. तसेच अनधिकृत व्यवहार आढळल्यास त्वरित बँक आणि सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news