Jalgaon Crime | संपत्तीच्या हव्यासातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप

जळगाव सत्र न्यायालयाचा निकाल; आईच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या मुलाच्या साक्षीने आरोपीला शिक्षा
Court Judgment
जन्मठेपPudhari File Photo
Published on
Updated on

Jalgaon Sessions Court Murder Case Verdict

जळगाव : संपत्ती आणि विम्याच्या पैशांच्या हव्यासापोटी सख्ख्या भावजयीचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या दिराला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दीपक लोटन सोनार असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश-२ श्रीमती ए. एस. खडसे यांच्या न्यायालयाने त्याला जन्मठेपेसह १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

विम्याच्या पैशांसह घर, प्लॉटच्या कागदपत्रांवरून वाद

पिंप्राळा परिसरातील मयुरी कॉलनी येथे २१ मे २०२१ रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती. मयत योगिता मुकेश सोनार यांचे पती मुकेश सोनार यांच्या अपघाती मृत्यूनंतर मिळालेल्या विम्याच्या रकमेसह घर आणि प्लॉटच्या कागदपत्रांवरून आरोपी दीपक सोनार, त्याची आई प्रमिला आणि नातेवाईकांकडून योगिता यांना त्रास दिला जात असल्याचे तपासात समोर आले.

Court Judgment
Jalgaon News : भूमिपूजनाचा फुसका बार की भुसावळकरांच्या जखमेवर मीठ? अमृत-१ चे काम अधूनच, तरीही अमृत-२ ची कुदळ मारली

घटनेच्या दिवशी दीपक घराच्या कागदपत्रांमध्ये छेडछाड करत असल्याचे योगिता यांच्या लक्षात आले. त्यांनी, “दीपकभाऊ काय करताय?” असा जाब विचारला. त्याचा राग आल्याने दीपकने दिवाणाखाली लपवून ठेवलेली कुऱ्हाड बाहेर काढली आणि योगिता यांच्या डोक्यावर प्राणघातक वार केले. ही घटना योगिता यांच्या लहान मुलाच्या डोळ्यांसमोरच घडली.

आर्यनच्या धाडसी साक्षीने आरोपी अडकला

आईवर हल्ला होत असताना लहानग्या आर्यनने दाखवलेले धाडस या प्रकरणात निर्णायक ठरले. आरोपीने कुऱ्हाडीने वार करत असताना आर्यनने त्याच्या तोंडात हात घालून गाल ताणला आणि त्याच्या हातातील कुऱ्हाड हिसकावून बाजूला फेकून दिली.

यानंतर आर्यनने पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तपासाधिकारी अनिल बडगुजर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

१७ साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण

या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी आर्यन सोनार, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद करत भक्कम पुरावे सादर केले. हे पुरावे आणि साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने दीपक सोनार याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Court Judgment
Jalgaon News | जळगावच्या बळीराजाला दिलासा! ‘अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती’तून ३१,९०८ शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १८४ कोटी वर्ग!

आईच्या आठवणीने आर्यनला कोर्टात हुंदका

निकालाचे वाचन सुरू असताना आईच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला आर्यन न्यायालयात उपस्थित होता. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येताच आईच्या आठवणीने आर्यनला न्यायालयातच हुंदका अनावर झाला. या भावनिक प्रसंगाने न्यायालय परिसरातील उपस्थितांचेही डोळे पाणावले.

logo
Pudhari News
pudhari.news