

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीने 2008 या वर्षापासून ते आजपर्यंत पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी दिलेला एकूण 16 लाख रुपयांचा शासकीय निधी हा बनावट बिले, खोट्या स्वाक्ष-या करून अपहर केला आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतला 2008 पासून ते आजपर्यंत भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने 16 लाख 12 हजार 68 रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र या निधी संदर्भात खोटे दस्तावेज तयार करून बनावट बिले तयार करून त्यावर खोट्या स्वाक्ष-या घेऊन अस्तित्वात नसलेल्या लोकांच्या संमतीने संपूर्ण निधी अपहार केला आहे. शासनाची फसवणूक केल्यामुळे या प्रकरणी विजयकुमार नामदेव काकडे (रा. चिखली) यांनी मुक्ताईनगर न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशाने मुक्ताईनगर पोलिसात आशा राजेंद्र कांडेलकर व युसुफ खान गुलाब खान फकीर (रा. चिखली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.