पुढारी ऑनलाईन : अयोध्येत आज सोमवारी (दि.२२) 'न भूतो न भविष्यती' असा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी अभिजित मुहूर्तावर अयोध्येतील राम मंदिरांच्या गर्भगृहात श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला अन् भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विधीवत विराजमान झाले. यामुळे आज ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली. (Ayodhya Ram Mandir Inauguration) डोळ्यावरून पट्टी काढण्यात आल्यानंतर श्री रामलल्लांचे मूखदर्शन सर्वांना घडले.
हा सोहळा देशवासीयांसाठी सर्वात आनंदाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी श्री रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा विधी सुरू झाला. त्यानंतर रामलल्लांच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली. पंतप्रधान मोदींनी रामलल्लांच्या डोळ्यांत सुवर्णदंडिकेने काजळ लावले आणि त्यांनी रामलल्लाला आरसा दाखवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते.
अयोध्या या 'न भूतो न भविष्यती' सोहळ्यासाठी सजली आहे. सोमवारी शहरात ११ लाख दिवे चेतविले जाणार आहेत. शहर अडीच हजार क्विंटल फुलांनी सजविण्यात आले आहे. सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख आहे. अयोध्येत तब्बल २५ हजारांवर जवान तैनात आहेत. रविवारी सकाळी श्री रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी शय्याधिवास पार पडला होता.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरसह बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत, विकी कौशल्य, कॅटरिना कैफ, रणबीर कपूर, अलिया भट्ट, अन्नू कपूर, अभिनेता रणदीप हुडा, दाक्षिणात्य अभिनेते रामचरण संगीतकार आदी अयोध्येत दाखल झाले. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
आज सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी दहापासून मंगल ध्वनी वाजविण्यात आला. विविध राज्यांतून आलेली ५० हून अधिक वाद्ये वाजविण्यात आली. शनिवारी सायंकाळीच अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. सोमवार मावळेपर्यंत प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित पाहुण्यांनाच, तेही पास दाखवल्यावरच अयोध्येत प्रवेश देण्यात आला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात अभिजीत मुहूर्तावर झाला होता. आज सोमवारी २२ जानेवारी रोजी मृगशीर्ष नक्षत्रात अभिजीत मुहूर्ताचा योगायोग आहे. त्यामुळेच या मुहूर्तावर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या शुभ मुहूर्तावर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केल्याने भगवान श्रीराम सदैव मूर्तीच्या आत वास करतील, असेही मानले जाते.
गर्भगृहातील प्रतिष्ठापना विधीअंतर्गत श्री रामलल्लाची एक मूर्ती दि.१७ जानेवारी श्रीराम जन्मभूमी संकुलात आणण्यात आली होती. मूर्तीचे पालखीमधून मंदिर परिसरात भ्रमणही पार पडले होते. त्यावेळी शरयू तटावरून मंदिरापर्यंत महिलांची कलशयात्राही काढण्यात आली होती. मूर्तीच्या आसनाचे पूजन करण्यात आले. निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास आणि पुरोहित सुनील दास यांनी गर्भगृहात ही पूजा केली होती. गर्भगृहात प्रतिष्ठापित करावयाच्या मूर्तीचेही शुद्धीकरण करण्यात आले होते. त्यावेळी श्री रामलल्लाच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली होती.
त्यानंतर म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली रामलल्लाची 'श्यामल' मूर्ती मोबाईल क्रेनच्या साहाय्याने गर्भगृहात ठेवण्यात आली. यावेळी स्वतः योगीराज उपस्थित होते. गुरुवारी १८ जानेवारी रोजी गर्भगृहात ही मूर्ती धार्मिक विधींसह स्थापित करण्यात आली होती.
प्राणप्रतिष्ठेच्या तीन दिवस आधी श्री रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक गेल्या शुक्रवारी १९ जानेवारी समोर आली होती. दशावतारी प्रभावळ असलेली श्री रामलल्लाची ४.५ फुटांची (५१ इंच) ही अत्यंत लोभस अशी बालस्वरूप मूर्ती आहे. प्रभावळीत विष्णूचे १० अवतार कोरण्यात आले आहेत. म्हैसूर येथील वाडियार राजघराण्याचे पारंपरिक शिल्पकार अरुण योगिराज यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. गर्भगृहासाठी तीन शिल्पकारांना काम देण्यात आले होते; पैकी योगिराज यांनी घडविलेल्या मूर्तीची सर्वानुमते निवड झाली. उर्वरित दोन मूर्तीही मंदिर संकुलात प्रतिष्ठापित करण्यात आल्या.
रविवारी सकाळी श्री रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी शय्याधिवास पार पडला. सायंकाळच्या आरतीनंतर दिवसाचे सर्व विधी पूर्ण झाले.
ॐ, स्वस्तिक, शंख-चक्र ही पवित्र चिन्हेही कमानीवर कोरलेली आहेत.
निळ्या आणि काळ्या पाषाणापासून ही मूर्ती बनविण्यात आलेली आहे.
श्री रामलल्लाच्या मस्तकावर सूर्याची प्रतिमा कोरलेली आहे.
श्री रामलल्ला उजव्या हाताने आशीर्वाद देत आहेत.
डाव्या हातात धनुष्यबाण आहे.
मुकुट सोन्याचा आहे.
मत्स्य, वराह, कूर्म, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे अवतार उजवीकडून डावीकडे अशा क्रमाने आहेत.
मूर्तीचे वजन सुमारे २०० किलो आहे.
हे ही वाचा :