

जळगाव: क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या शाब्दिक वादाची ठिणगी जळगावातील तांबापुरा भागात रविवारी (दि. ९ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजेच्या सुमारास पडली. या वादातून दोन गट एकमेकांसमोर आले आणि त्यांनी दगड, विटांची तुफान फेकाफेक करत गोंधळ घातला. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार तीन जण जखमी झाले असून, परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. पोलीस प्रशासनाने तत्काळ पाऊले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
परिसरातील मुले दर रविवारी मेहरुण तलावाजवळील जे.के.पार्क याठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी जातात. आजही (९ नोव्हेंबर) खेळ खेळताना किरकोळ शाब्दिक वाद झाला. सामना संपल्यानंतर सर्व मुले घरी परतले असताना, दुपारी याच वादातून तांबापुरात, विशेषतः टिपू सुलतान चौक आणि गवळी वाडा चौक परिसरात दोन गट आमनेसामने आले.
दोन्ही गटांनी एकमेकांच्या दिशेने दगड आणि विटा भिरकवण्यास सुरुवात केली. घरांच्या छतावर दगड पडल्याने नागरिकांमध्ये, विशेषतः महिला आणि लहान मुलांमध्ये घबराट पसरली आणि सर्वत्र पळापळ झाली. दगडांच्या मोठ्या आवाजाने परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. घटनेनंतर रस्त्यावर ठिकठिकाणी दगडांचा खच दिसून आला.
पोलिसांची तत्काळ धाव
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत दंगा नियंत्रण पथक आणि एलसीबी पथक (स्थानिक गुन्हे शाखा) तांबापुरात धावले.
जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, दगडफेक झालेल्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. पोलिसांनी हल्लेखोरांना पांगवत त्वरित परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
जखमींवर उपचार सुरू
या दगडफेकीच्या घटनेत एक सतरा वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांनुसार त्याची प्रकृती स्थिर आहे.
शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी या घटनेबद्दल नागरिकांना गैरसमज न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, "ही मुले दर रविवारी एकत्र खेळत असतात. त्यांच्यात किरकोळ वाद झाला आणि त्यातून ही दगडफेक झाली. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, सध्या शांतता आहे आणि व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. नागरिकांनी घाबरू नये, पोलिसांचे संपूर्ण परिसरावर लक्ष आहे." सध्या तांबापुरा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून, शांतता कायम ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.