

जळगाव : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 पारदर्शक, शांत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी तत्परतेने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आढावा बैठकीत दिले आहे.
या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, सहआयुक्त नगरपरिषद जनार्दन पवार, तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित पोलीस अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2025 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. 4 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल: 10 ते 17 नोव्हेंबर दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत
अंतिम उमेदवार यादी: 26 नोव्हेंबर
मतदान: 2 डिसेंबर, सकाळी 7.30 ते सायं. 5.30
मतमोजणी व निकाल: 3 डिसेंबर, सकाळी 10 वाजल्यापासून
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कायदा व सुव्यवस्थेच्या चौकटीत पार पडली पाहिजे. यासाठी पोलीस विभागाला आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. संवेदनशील भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था, गुन्हेगारांवर कारवाई आणि मद्य व पैशांच्या वितरणावर कठोर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले गेले. गुंडगिरी, धमकावणे किंवा आर्थिक शक्तीचा गैरवापर केल्यास त्वरित कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
फरार, सराईत गुन्हेगार तसेच जामीनावर किंवा पॅरोलवर सुटलेल्यांवर नजर ठेवून आवश्यक ती कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी भरारी पथक (Flying Squad), चेक पोस्ट पथक (SST) आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम (VST) सक्रिय ठेवण्याचे निर्देश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. निवडणुकीसंबंधी परवानग्या जलद आणि पारदर्शकपणे देण्यासाठी ‘एकल खिडकी प्रणाली’ (Single Window System) सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच तडीपारी प्रकरणांचा निपटारा तातडीने करण्यास सांगण्यात आले.
मतदान केंद्रांवरील सुविधांबाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, प्रत्येक केंद्रावर वीज, पाणी, शौचालय आणि दिव्यांगांसाठी रॅम्प यांसारख्या मूलभूत सोयी उपलब्ध असाव्यात. ज्या केंद्रांवर या सुविधा नाहीत, तिथे तात्काळ व्यवस्था करण्याचे आदेश दिले गेले. मतदान आणि मतमोजणी अधिकारी तसेच कर्मचार्यांचे दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण आयोजित केले जाणार असून, त्यात EVM हाताळणी, मॉक पोल आणि मतमोजणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दिले जाईल.
बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व विभागांना परस्पर समन्वय राखून वेळेत तयारी पूर्ण करण्याचे आवाहन केले, जेणेकरून निवडणूक प्रक्रिया शांत, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडली जाईल.