

Chalisgaon Combing Operation
जळगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी बुधवारी (दि.२४) पहाटे विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारी प्रवृत्तींवर धडक कारवाई केली. पहाटे २ ते ४ या वेळेत पार पडलेल्या या मोहिमेत धारदार शस्त्रसाठा जप्त करण्यात आला, अवैध दारूविरोधात कारवाई करण्यात आली तसेच प्रलंबित वॉरंटांची बजावणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान शहरातील ८० रेकॉर्डवरील आरोपींची चौकशी करण्यात आली. त्यापैकी ४४ आरोपी घरी आढळून आल्याने त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली.
कारवाईदरम्यान इंदिरानगर येथील आरती किरण देढे (सध्या रा. नवनाथ नगर, धुळे रोड) आणि नारायणवाडी येथील महेंद्र रंगनाथ हतांगळे यांच्या भाड्याच्या घरातून विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या १८ तलवारी व १० कोयत्यांसदृश धारदार शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय नागद रोड झोपडपट्टी परिसरात फरीद खान शाबीर खान हा अवैधरित्या तलवार बाळगताना आढळून आल्याने त्याच्याविरोधातही शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली.
संशयास्पद हालचालींसाठी वापरल्या जात असल्याच्या संशयावरून पोलिसांनी तीन चारचाकी वाहने ताब्यात घेतली. यामध्ये मारुती सुझुकी वॅगन-आर, ऑडी आणि हुंदाई वरना या वाहनांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे ३९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. संबंधित वाहनधारकांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये कारवाई करण्यात आली.
मोहिमेदरम्यान न्यायालयाकडून प्राप्त ८ पकड वॉरंट आणि ३ समन्सची यशस्वी बजावणी करण्यात आली. तसेच दारूबंदी कायद्यांतर्गत ३ गुन्हे नोंदवून ६० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. याशिवाय सुमारे १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले.
पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, चाळीसगाव उपविभागातील ६० पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि तीन आरसीपी प्लाटून सहभागी झाले होते.
या व्यापक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावी अंकुश बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.