

जळगाव : बुलढाणा येथील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. पहूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आज (सोमवार) दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर कारने तत्काळ पेट घेतल्याने झालेल्या अग्नितांडवात गाडीतील एका महिलेचा भाजून दुर्दैवी मृत्यू झाला, तर पतीला स्थानिक नागरिकांनी वेळीच बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले.
आज दुपारी २:३० ते ३:०० वाजेच्या सुमारास पहूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एच.पी. फार्महाऊस (H.P. Farmhouse) समोर हा थरारक अपघात घडला. बुलढाणा जिल्ह्यातील कुळमखेडा येथील रहिवासी असलेले संग्राम जालमसिंग मोरे हे आपली पत्नी जान्हवी संग्राम मोरे (वय अंदाजे २१) यांच्यासह कारने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारच्या इंजिन भागातून आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण कारने पेट घेतला.
पती वाचला, पत्नीचा दुर्दैवी अंत
स्थानिक नागरिक आणि वाटसरूंनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी अथक प्रयत्न करून संग्राम जालमसिंग मोरे यांना सुखरूपपणे जळत्या कारमधून बाहेर काढले. त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
मात्र, दुर्दैवाने कारला लागलेल्या भीषण आगीमुळे त्यांच्या पत्नी जान्हवी संग्राम मोरे यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. या हृदयद्रावक घटनेत त्यांचा भाजून जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृत महिला जान्हवी मोरे यांच्या पार्थिवाचा इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
पहूर पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी आणि तपासणी उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम आणि पहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ए.पी.आय.प्रमोद कठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. भरत दाते हे करीत आहेत.