

जळगाव : जळगाव शहरातील शनिपेठ परिसर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरला आहे. कांचननगर भागात रविवारी (दि.9) रात्री दहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मात्र, मुख्य आरोपी आकाश सपकाळे उर्फ ‘डोया’ अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून आकाश सपकाळे याने आकाश बाविस्कर उर्फ टपऱ्या, गणेश सोनवणे आणि तुषार सोनवणे उर्फ शंभू यांच्यावर गोळीबार केला. यात आकाश बाविस्करचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आरोपी डोया याच्यावर तब्बल 18 ते 19 गुन्हे दाखल असून तो तडीपार गुन्हेगार आहे. नुकत्याच झालेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान तो घरात सापडल्याने त्याच्यावर कारवाईही करण्यात आली होती.
तडीपार असूनही डोया शहरात मुक्तपणे फिरत होता आणि अवैध शस्त्र बाळगत होता, यामुळे शनिपेठ पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक पोलिसांना या हालचालीबद्दल काहीच माहिती नसल्याचे दिसून आले, तर कोंबिंग ऑपरेशनदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेनेच त्याला पकडले होते. त्यामुळे शनिपेठ पोलिसांचे गुप्त जाळे व माहिती यंत्रणा निष्क्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलिसांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
गोळीबारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या घटनेबाबत माहिती विचारण्यासाठी पत्रकारांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, "दहा मिनिटांनी फोन करा", "मॅडम आल्यावर माहिती देऊ" अशी उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याने पोलिसांच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत गोळीबाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. नुकत्याच एरंडोल एमआयडीसी परिसरातही अशीच घटना घडली होती. त्यामुळे गुन्हेगारांकडे अवैध शस्त्रांचा साठा वाढत असून ते सहज उपलब्ध होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक पोलिसांनी या घटनांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.