

Jalgaon traffic police penalty
जळगाव: शहरातील सर्वात महत्त्वाचा आणि वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या आकाशवाणी चौकात सध्या वाहतूक शाखेच्या 'कर्तव्यदक्ष' पणाचा विचित्र प्रत्यय नागरिकांना येत आहे. एकीकडे सूर्यदेव आग ओकत असताना दुपारच्या वेळी सावलीचा आधार घेणाऱ्या वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांची लांबलचक यादी ऐकवून दंड ठोठावण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे.
मात्र, याच चौकात नेमके वाहन उभे कुठे करायचे आणि डाव्या बाजूला रस्ता कुठे रिकामा सोडायचा, याचे कोणतेही दिशादर्शक फलक किंवा पांढरे पट्टे मारण्याचे सौजन्य वाहतूक शाखेने दाखवलेले नाही. त्यामुळे "सूचना नाहीत, पण दंड मात्र आहे", असा अजब कारभार सध्या या चौकात सुरू आहे.
सध्या जळगावमध्ये तापमानाचा पारा चढलेला आहे. दुपारच्या वेळी सिग्नलवर उभे असताना उन्हाच्या चटक्यांपासून वाचण्यासाठी अनेक दुचाकीस्वार झाडाच्या किंवा इमारतीच्या सावलीत थांबण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी मागून येणारी बस किंवा मोठी वाहने कर्कश हॉर्न वाजवून बाजूला सरकण्यास भाग पाडतात. वाहनधारक थोडा पुढे सरकला की, समोर दबा धरून बसलेले पोलीस कर्मचारी त्याला अडवतात आणि नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून खिशाला कात्री लावतात. भररस्त्यात आपली 'वर्दीची पावर' दाखवताना आपण सर्वसामान्य नागरिकांशी कसे बोलतोय, याचेही भान काही कर्मचाऱ्यांना उरलेले नाही.
रहदारीच्या नियमानुसार चौफुलीवर डावी बाजू नेहमीच खुली असते, असे म्हटले जाते. मात्र, आकाशवाणी चौकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहनधारकांनी डावी बाजू सोडून कुठे उभे राहावे, यासाठीचे मार्क किंवा खुणा पुसल्या गेल्या आहेत. अनेक ठिकाणी सूचना फलकांचा पत्ता नाही. खुणा नसल्यामुळे नागरिक आपल्या सोयीनुसार अर्थ काढतात आणि नेमके तिथेच पोलीस त्यांना जाळ्यात पकडतात. प्रशासनाने आधी रस्ते आणि सिग्नल्सची योग्य आखणी करावी की केवळ वसुलीवर लक्ष केंद्रित करावे? असा सवाल संतप्त जळगावकर विचारत आहेत.
या गोंधळाबाबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देसले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नेहमीप्रमाणे "डावी बाजू ही वाहतुकीसाठी नेहमीच खुली असते," असे तांत्रिक उत्तर दिले. मात्र, ही बाजू नेमकी कोणती आणि ती ओळखण्यासाठी चौकात खुणा का नाहीत? या प्रश्नावर मात्र प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
आकाशवाणी चौकात झेब्रा क्रॉसिंग आणि डावी बाजू दर्शवणारे पट्टे कधी मारले जाणार?
उन्हात सावली शोधणे हा गुन्हा आहे का?
वाहतूक पोलीस मार्गदर्शक म्हणून काम करणार की फक्त 'वसुली दूत' म्हणून?