Jalgaon theft news | जळगाव, चाळीसगावात चोरट्यांचा अक्षरशः 'राडा'; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

३ आरोपी जेरबंद; चाळीसगावात पावणे तीन लाखांचे दागिने लांबवले
theft case
theft casePudhari
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून जळगाव शहर आणि चाळीसगाव परिसरात चोरीच्या तीन मोठ्या घटना समोर आल्या आहेत. यात कुठे मजुराच्या घरातील हक्काची कमाई ओरबाडली गेली, तर कुठे घराचा कडीकोंडा तोडून लाखो रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. दरम्यान, जळगाव पोलिसांनी एका गुन्ह्याचा छडा लावत तीन संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत.

गेंदालाल मिलमध्ये मजुराच्या घरावर डल्ला; ३ आरोपींना पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव: शहरातील गेंदालाल मिल परिसरातील बिल्डिंग क्रमांक ४२, रूम नंबर २ मध्ये राहणारे शेख रईस शेख रशीद हे हात मजुरी करून आपले कुटुंब चालवतात. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची खिडकी तोडून आत प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील चांदीच्या अंगठ्या व रोख रक्कम असा एकूण १० हजार ४०० रुपयांचा माल लंपास केला.

या घटनेनंतर जळगाव शहर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली असून, या गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी आरोपींना अटक केल्याने दिलासा मिळाला आहे.

चाळीसगावात कॉन्ट्रॅक्टरच्या घरी धाडसी चोरी; २ लाख ९२ हजारांचा ऐवज चोरीला

चाळीसगाव शहरातील मुनखेडा रोडवरील महादेव चौक परिसरात राहणारे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर रवींद्र वाल्मीक महाजन (वय ४२) यांच्या घरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. २५ मार्चच्या रात्री साडेअकरा ते २६ मार्चच्या पहाटे ४ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

चोरट्यांनी महाजन यांच्या राहत्या घराचा कडीकोंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोने आणि चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. सकाळी चोरी झाल्याचे लक्षात येताच महाजन यांनी पोलीस स्टेशन गाठले. चाळीसगाव शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

३. ८ हजारांचे दागिने लांबवले

चाळीसगाव तालुक्यातील वागडी येथेही चोरट्यांनी अमोल बाळू खैरे यांच्या घराला लक्ष्य केले. खैरे यांच्या 'मातोश्री निवास' या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीचा आणि त्यांचे वडील बाबा भागवत खैरे यांच्या खोलीचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील चाबीने लॉक उघडून ८ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले. खैरे कुटुंबाने या प्रकरणी तक्रार दिली असून ग्रामीण भागातही आता गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

एकीकडे जळगाव शहर पोलिसांनी गेंदालाल मिलमधील चोरीचे आरोपी पकडले असले, तरी चाळीसगावात एकाच रात्री झालेल्या दोन चोऱ्यांनी पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भरवस्तीत कडीकोंडे तोडले जात असताना पोलीस नेमके कुठे होते? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news