

Jalgaon Anti Corruption Bureau
जळगाव : कारच्या कायमस्वरूपी पासिंगसाठी आरटीओ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने दिव्यांग वकिलाकडे लाच मागणाऱ्या खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. इच्छादेवी चौकातील बजाज टीव्हीएस शोरूमजवळ ही कारवाई करण्यात आली. योगेश रामभाऊ पाटील (वय ३९, रा. आदर्शनगर, जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे.
तक्रारदार हे व्यवसायाने खासगी वकील असून दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी १ जुलै रोजी खानदेश मोटार शोरूममधून मारुती अल्टो के-१० कार खरेदी केली होती. खानदेश मोटार्सच्या खासगी एजंट योगेश पाटील याच्यामार्फत ३ ऑगस्ट रोजी वाहनाचे तात्पुरते रजिस्ट्रेशन करण्यात आले. दिव्यांगत्वामुळे तक्रारदारांनी कारमध्ये हँडकिट बसवून घेतले होते.
यानंतर १२ ऑगस्ट रोजी कारच्या कायमस्वरूपी पासिंगसाठी तक्रारदार आरटीओ कार्यालयात गेले असता, योगेश पाटील याने त्यांच्याशी संपर्क साधला. आरटीओतील अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांकडून वाहनाचे पासिंग करून देण्यासाठी त्याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ही रक्कम ८ हजार ५०० रुपये ठरली.
मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदारांनी थेट जळगाव एसीबीकडे धाव घेत १७ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी आरटीओ कार्यालयाच्या आवारात पंचांसमक्ष कारवाई केली. त्यावेळी योगेश पाटील याने ७ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार एसीबीने इच्छादेवी चौकातील बजाज टीव्हीएस शोरूमजवळ सापळा रचला. तक्रारदाराकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने योगेश पाटील याला रंगेहात पकडले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, सुनील वानखेडे आणि राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.