

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील रायपूर येथील ग्रामपंचायतीतील सदस्यांविरुद्ध आलेला अर्ज निकाली काढून चांगला अहवाल देण्यासाठी २० हजारांची लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील २ लिपिकांना अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि.९) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात केली. Jalgaon bribe case
महेश रमेशराव वानखेडे (वय 30 , लिपीक ग्रामपंचायत विभाग), समाधान लोटन पवार ( लिपिक, ग्रामपंचायत विभाग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. Jalgaon bribe case
याबाबत अधिक माहिती अशी की, रायपूर येथील तक्रारदार 2021 मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आले होते. त्यानंतर तक्रारदार यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे तीन अपत्य असल्याबाबत तक्रारी अर्ज दाखल झाला आहे. हे प्रकरण लिपिक महेश वानखेडे यांच्याकडे पेडींग होते. त्यामुळे तक्रारदार महेश यांना कार्यालयात भेटले असता महेश यांनी तुम्ही अपात्र होणार नाही, असा अहवाल तयार करतो. त्यासाठी ३० हजार रुपये द्यावे लागतील.
दरम्यान, याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावण्यात आला. यावेळी २० हजारांची लाच घेताना लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन. एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सुरेश पाटील, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी, रविंद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, प्रणेश ठाकुर, राकेश दुसाने, प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली.
हेही वाचा