

जळगाव : माणुसकीला कोणताही धर्म नसतो, याचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात आला आहे. तब्बल ८० वर्षांपासून एका हिंदू कुटुंबाचा अविभाज्य भाग राहिलेले १०० वर्षीय कय्युम खान नूर खान (खान बाबा) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देवरे-सोनार कुटुंबाने मुस्लिम धर्मपद्धतीनुसार त्यांचा जनाजा (अंत्ययात्रा) स्वतःच्या घरून काढत त्यांना साश्रू नयनांनी निरोप दिला.
कय्युम खान हे मूळचे यावलमधील काजीपुरा भागातील रहिवासी. वयाच्या २० व्या वर्षी ते शहरातील अशोक देवरे-सोनार यांच्याकडे सराफी कारागीर म्हणून कामाला लागले होते. बघता बघता ८० वर्षे उलटली, पण खान बाबा या कुटुंबाशी इतके एकरूप झाले की ते या घराचे ज्येष्ठ सदस्यच बनले. वार्धक्यामुळे ते थकल्यानंतरही देवरे कुटुंबाने (अशोक देवरे, ज्योती देवरे, ऋषी देवरे) त्यांची सेवा मुलाप्रमाणे केली.
मंगळवारी वयाच्या १०० व्या वर्षी खान बाबांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच पुणे आणि मुंबई येथे असलेले देवरे कुटुंबातील मुले, मुली, जावई आणि नातवंडे अंत्यदर्शनासाठी तातडीने यावलला पोहोचले. बुधवारी देवरे-सोनार यांच्या राहत्या घरापासून खान बाबांची अंत्ययात्रा निघाली.
या अंत्ययात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे, देवरे कुटुंबातील सदस्यांनी खान बाबांच्या जनाजाला मुस्लिम धर्मपद्धतीनुसार खांदा दिला. केवळ खांदाच दिला नाही, तर कब्रस्तानमध्ये दफनविधीच्या वेळीही या हिंदू कुटुंबाने पुढाकार घेतला आणि 'मुठ माती' देऊन आपल्या लाडक्या बाबांचा निरोप घेतला.
"खान बाबा आमच्यासाठी केवळ कारागीर नव्हते, तर ते आमच्या घराचे आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबातील एक ज्येष्ठ व्यक्ती हरपली आहे. अशी प्रतिक्रीया देवरे-सोनार कुटुंबांतील सदस्यांनी दिली.