

जळगाव : जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जळगाव विशेष जलद न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि १४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे, या गुन्ह्यात मदत करणाऱ्या संगीताबाई गोकुळ पाटील या महिला आरोपीलाही न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
पारोळा तालुक्यातील दगडी सबगव्हाण येथील आरोपी ज्ञानेश्वर साहेबराव जोगी (वय २८) याने पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. या काळात त्याने मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले, ज्यामुळे पीडिता गर्भवती राहिली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण जळगाव येथील विशेष जलद गती न्यायालयात चालले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. भागडीया - झवर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. खटल्यादरम्यान एकूण १६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. स्वतः पीडित मुलीने दिलेली साक्ष अत्यंत मोलाची ठरली.
४ डॉक्टरांची साक्ष आणि डीएनए (DNA) तज्ज्ञांचा अहवाल यामुळे गुन्ह्याची सिद्धता झाली.तपासी अधिकारी एपीआय गणेश अहिरे आणि एपीआय जीभाऊ पाटील यांनी केलेला तपास शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने मुख्य आरोपी ज्ञानेश्वर जोगी याला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास सुनावला. तसेच, या कामी त्याला साथ देणाऱ्या संगीताबाई पाटील हिलादेखील गुन्ह्यात सहभागी असल्याबद्दल २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली.